बेपत्ता मोबाईलमुळे वाढले मृत्यूचे गूढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:04 AM2019-09-10T01:04:25+5:302019-09-10T01:04:53+5:30
भट्टड यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात स्थानिक पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांचा मोबाईल, त्यातील कॉल रेकार्ड हा महत्त्वाचा पुरावा असताना, त्याच्या अनुषंगाने तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. सामाजिक व राजकीय संघटनांनी डॉ. भट्टड यांच्या आकस्मिक मृत्यूवर संशय व्यक्त केला असताना, पोलिसांनी त्यांचा मोाबईल ताब्यात घेण्यात कुठलेही स्वारस्य दाखविलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : येथील प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात स्थानिक पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांचा मोबाईल, त्यातील कॉल रेकार्ड हा महत्त्वाचा पुरावा असताना, त्याच्या अनुषंगाने तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. सामाजिक व राजकीय संघटनांनी डॉ. भट्टड यांच्या आकस्मिक मृत्यूवर संशय व्यक्त केला असताना, पोलिसांनी त्यांचा मोाबईल ताब्यात घेण्यात कुठलेही स्वारस्य दाखविलेले नाही. मृत डॉक्टरचा मोबाइल गायब असल्याची माहिती पोलीस विभागातील एका जबाबदार कर्मचाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
कुठलाही मृत्यू वा घात प्रकरणात संबंधिताने मृत्युपूर्वी कुणाशी संवाद साधला, हे तपासले जाते. त्या मोबाइलचे कॉल डिटेल्स मागविले जातात. मात्र, डॉ. भट्टड यांच्या मृत्यूवर चहुबाजूने संशयकल्लोळ उठला असताना, पोलिसांनी मृताचा मोबाइल ताब्यात घेतलेला नाही. ५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्याच रुग्णालयातील रेस्ट हाऊसमध्ये आढळला. मात्र, सामाजिक भीतीपोटी पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी गळफास घेतलेल्या स्थितीतून मृतदेह खाली काढण्यात आला, असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे अन्य आत्महत्या प्रकरणाचा तपास जसा थंडबस्त्यात टाकला जातो, तोेच प्रकार डॉ. भट्टड यांच्या आत्महत्या प्रकरणात केला जात आहे की काय, असा संशय सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. याशिवाय मृत्यूपूर्वी डॉ. भट्टड यांची मसाज करून देणारी खन्ना नामक व्यक्ती शहरातून पसार झाल्याची माहिती असताना, पोलिसांनी त्या व्यक्तीला किमान चौकशीसाठी तरी बोलावण्याची तत्परता दाखविलेली नाही. त्यामुळे डॉ. भट्टड यांचा मोबाइल ताब्यात घेऊन व त्यातील कॉल डिटेल्स तपासून पोलिसांनी ‘दूध का दूध..’ करावे, मसाज करणाºया व्यक्तीचे बयाण नोंदवावे, अशी दर्यापूरकरांची अपेक्षा आहे.
मेमरी कार्ड पडूनच
डॉ. भट्टड यांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली, त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यासाठी पोलिसांनी डीव्हीआरमधील मेमरी कार्ड ताब्यात घेतले. मात्र, त्यातील साठवून ठेवलेली माहिती वा डाटा उघड करण्यासाठी आवश्यक असलेला पासवर्ड माहीत नसल्याने मेमरी कार्डमधील फुटेजची तपासणी थांबली असल्याची माहिती ठाणेदार नऱेंद्र डंबाळे यांनी दिली.