आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आकार’; नीट, जेईई, सीईटीचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 08:11 PM2020-08-03T20:11:24+5:302020-08-03T20:11:52+5:30
आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे धडे घेता यावे, यासाठी ‘मिशन आकार’हा प्रकल्प राबविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे धडे घेता यावे, यासाठी ‘मिशन आकार’हा प्रकल्प राबविला जात आहे. यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीचे मार्गदर्शन देण्यात येत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत सात प्रकल्पांमध्ये ८३ शासकीय, तर १२२ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहे. त्यापैकी शासकीय आश्रमशाळांशी संलग्न २५, तर अनुदानित आश्रमशाळांशी संलग्न ३७ उच्च माध्यमिकचे वर्ग आहेत. या उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये बारावीत विज्ञान शाखांमध्ये विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीच्या परीक्षेबाबतचे मार्गदर्शन करण्याचा ‘मिशन आकार’ हा प्रकल्प आहे. या माध्यमातून वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते.
यंदा २० ते ३० जून या दरम्यान हा प्रकल्प आदिवासी विकास विभाग, नागपूर येथील आकार बहुउद्देशीय विकास संस्था व आकार ग्रुप ऑफ इन्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला गेला. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीचे परीक्षेबाबतचे नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात आले. या ऑनलाईन वर्गासाठी गुगलवर उपलब्ध अर्जाद्वारे धारणी, पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमुनरी, औरंगाबाद व अकोला प्रकल्प कार्यालय अंतर्गत शासकीय, अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या २५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, हे विशेष. ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात आशिष दर्यापूरकर, सचिन बोंगावार, वीरेंद्र सांगोडे, श्रीमती मीनाक्षी, धनराज लांजे, सुषमा गौतम या तज्ज्ञ प्राध्यापक मंडळींनी मार्गदर्शन केले.
दरवर्षी दोन महिन्यांचा निवासी मार्गदर्शन वर्ग राबविला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीचे परीक्षेबाबतचे नि:शुल्क मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. याचा विद्यार्थ्यांना निश्चितच वैद्यकीय, अभियांत्रिकी अथवा चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी लाभ होईल.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’ अमरावती.
ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग
कोरोना संसर्गाने इयत्ता बारावीचे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे घरी होते. त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. गुगल मीट अॅपच्या माध्यमातून मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटी परीक्षेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र विषयांचे ऑनलाईन मार्गदर्शन मिळाले तसेच पीडीएफ स्वरूपात विद्यार्थ्यांना नोट्स पुरविण्यात आल्या.