जातीय सलोख्यासाठी ‘मिशन सर्वधर्म समभाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 10:43 AM2021-11-18T10:43:04+5:302021-11-18T10:44:12+5:30
अमरावतीतील परिस्थिती आटोक्यात आणून जातीय सलोखा टिकविण्यासाठी शहर आयुक्तालय क्षेत्रात ‘मिशन सर्वधर्म समभाव’ राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी पटवा चौकातील प्रभाकरराव वैद्य यांच्या संबोधनाने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शुक्रवार व शनिवारी लागोपाठ घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला. ती परिस्थिती आटोक्यात आणून जातीय सलोखा टिकविण्यासाठी शहर आयुक्तालय क्षेत्रात ‘मिशन सर्वधर्म समभाव’ राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी पटवा चौकातील प्रभाकरराव वैद्य यांच्या संबोधनाने करण्यात आली.
शहरातील ज्या भागात हिंसाचार उफाळला, लोक आमनेसामने ठाकले, अशा संवेदनशील ठिकाणी, विविध धर्मगुरू विशेषत: तरूणाईला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हिंदू, मुस्लिम, शिख. इसाई या धर्मगुरूंसोबतच समाजातील प्रभावशाली व्यक्तींचा त्यात समावेश आहे. हिंसाचाराच्या परिणामावर यात समुपदेशन केले जाईल. संवेदनशील भागातील सर्व समुदायांचे प्रतिनिधी, पोलिसांचा समावेश असलेले व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून अफवा पसरिवणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याचा मानसदेखील पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केला.
आज ११ ते ५ शिथिलता
संचारबंदीमध्ये गुरूवारी ११ ते ५ अशी शिथिलता देण्यात येणार आहे. त्यात जीवनावश्यक वस्तू, पेट्रोलपंप सुरू राहतील, सोमवारपर्यंत शिथिलतेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. मेडिकल २४ बाय ७ सुरू असतील.
सध्या १५०० पोलीस रस्त्यावर आहेत. कुणीही अफवा पसरवू नका. अफवेला बळी पडुू नका. दोन्ही दिवसांतील घटनांच्या अनुषंगाने अटकसत्र चालू आहे. कुणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही.
- डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त