मिशन लोकसभा: २२ हजार कर्मचारी, २८४ झोनल अधिकारी, १२८ नोडल अधिकारी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: February 23, 2024 09:54 PM2024-02-23T21:54:33+5:302024-02-23T21:55:40+5:30
मनुष्यबळाची जुळवाजुळव.
गजानन मोहोड, अमरावती: जिल्हा निवडणूक विभागात सध्या लोकसभेची तयारी जोरात सुरू आहे. त्यामध्ये झोनल व नोडल अधिकाऱ्यांची निश्चिती झालेली आहे व त्यांचे प्रशिक्षणही आटोपले आहे, शिवाय २१,६९० मनुष्यबळाचे नियोजन झालेले आहे. त्यांचे प्रशिक्षण प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर होत असल्याची माहिती या विभागाने दिली.
लोकसभा निवडणुकीत दोन टप्पे महत्त्वाचे असतात. त्यामध्ये पहिला भाग हा मतदार यादीचा असतो. त्यासाठी निवडणूक यंत्रणा चार महिन्यांपासून व्यस्त होती. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी जाहीर केली. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीसाठी आवश्यक मतदान केंद्र, मनुष्यबळ, प्रशिक्षण याची तयारी निवडणूक विभागाद्वारा अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात शासकीय विभागातील १४६६० पुरुष व ७०३० महिला कर्मचारी यांची माहिती जिल्हा विभागाकडे प्राप्त आहे. याशिवाय प्रत्येक मतदारसंघात १६ याप्रमाणे आठ मतदारसंघात १२८ नोडल अधिकारी राहतील. झोनल अधिकाऱ्यांमध्ये मेळघाट मतदारसंघात ४५, धामणगाव ३९, अमरावती ३०, बडनेरा २६, मोर्शी ३९, अचलपूर ३०, दर्यापूर ४२ व तिवसा विधानसभा मतदारसंघात ३३ असे एकूण २८४ झोनल व राखीव अधिकारी राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांसह सीपींद्वारा गोडाऊनची पाहणी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ मार्गावरील स्ट्राँगरूम, गोडाऊनची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महापालिका आयुक्त देवीदास पवार यांच्यासह अन्य अधिकारी यांनी गुरुवारी पाहणी केली व आवश्यक सूचना यंत्रणेला दिलेल्या आहेत.
निवडणुकीसाठी तालुकानिहाय मनुष्यबळ
लोकसभा निवडणुकीसाठी धारणी तालुक्यात १४१९, चिखलदरा १७८६, अंजनगाव सुर्जी ९५६, अचलपूर १६१९, चांदूरबाजार १४४३, मोर्शी ९१५, वरुड १५६७, तिवसा ८०३, अमरावती ६६०६, भातकुली ८२८, दर्यापूर ११८६, नांदगाव खंडेश्वर ९४४, चांदूर रेल्वे ७३५ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ८८३ कर्मचारी यांची माहिती निवडणूक विभागाला प्राप्त झालेली आहे.