सरकारी कार्यालयाचा दुरुपयोग!
By admin | Published: June 19, 2016 12:02 AM2016-06-19T00:02:06+5:302016-06-19T00:02:06+5:30
विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या पदवीधरांच्या नोंदणीमध्ये सरकारी कार्यालयाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप..
युवक काँग्रेसचा आरोप : पदवीधर नोंदणीतील गैरप्रकार
अमरावती : विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या पदवीधरांच्या नोंदणीमध्ये सरकारी कार्यालयाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सचिव भय्या पवार यांनी केला आहे. यासंदर्भात शनिवारी पवार यांच्या नतृत्वात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
२७ मे रोजी जिल्हा परिषदेतील एनआरएचएम येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून अनधिकृतरीत्या पदविधरांची नोंदणी सुरू होती, तर १५ जून रोजी अमरावती तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात लतीश देशमुख हे पदवीधर मतदारसंघाच्या अर्जावरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व अन्य माहिती घेत असल्याचे दिसून आले होते, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. मात्र, त्यानंतरही नायब तहसीलदार रमेश इंगोले व लिपिक शिंदे यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आली नाही. त्यापूर्वी एनआरएचएममधील दोषींवरही कारवाई करण्यात आली नाही. संबंधिताची थातुरमातूर चौकशी करून सदर प्रकरण दडपण्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. शनिवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी न बोलाविल्याने दुपारी २ वाजेपर्यंत या पदाधिकाऱ्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले. यावेळी राहूल येवले, गुड्डु धर्माळे, फिरोज भाई, गुड्ड हमीद, आदित्य पेलागडे यांच्यासह आदी उपस्थित होते. पदवीधर निवडणूक तोंडावर आली असताना मतदार नोंदणीमध्ये होणारे गैरप्रकार थांबवावेत व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. (प्रतिनिधी)