नोकरीचा शब्द मिळाला अन् दिव्यांग रजनीला गहिवरून आले..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 05:56 PM2022-12-22T17:56:17+5:302022-12-22T17:56:44+5:30
भंडाऱ्याच्या दिव्यांग मुलीसाठी आ. बच्चू कडू यांचा पुढाकार
चांदूर बाजार (अमरावती) : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सर्व आमदार सभागृहात उपस्थित होते. आमदार बच्चू कडू मात्र सभागृहात हजेरी लावून थेट भंडारा जिल्ह्यातील अपंग मुलीला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे त्या मुलीला घेऊन गेले. नुसते गेलेच नाही तर ९० टक्के दिव्यांग असलेल्या तिला शासकीय आर्थिक मदत व नोकरीचे आश्वासन ही मिळवून दिले. दिव्यांगांसाठी लढणाऱ्या बच्चू कडू नावाच्या या कार्यकर्त्याचे जेव्हा त्या मुलीने आभार मानले तेव्हा तिला गहिवरून आले होते.
भंडारा जिल्ह्यातील तीन बहिणींची ही व्यथा आहे. वडिलांचा २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर दोन वर्षांनी आईलाही देवाज्ञा झाली. तिन्ही बहिणी निराधार झाल्या. आई साकोली येथे जलसंपदा विभागत शिपाई म्हणून कार्यरत होती. नोकरीत कार्यरत असतानाच आईचा मृत्यू झाला. बहिणींपैकी सर्वात लहान बहीण,९० टक्के अपंग आहे. तिला आईच्या जागेवर, अनुकंपा अंतर्गत नोकरी देण्याची शासनाला विनंती केली. परंतु संबंधित विभागाने साधी दखलही घेतली नाही.
शासनाकडे वारंवार दाद मागून ही त्यांना न्याय मिळत नव्हता. अखेर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी बच्चू कडू भंडारा दौऱ्यावर असताना आपण न्याय मिळवून देऊ,असा शब्द कडू यांनी दिला. त्यानुसार २० डिसेंबर रोजी या बहिणींना,नागपूर येथे बोलावून घेतले. अधिवेशनात सभागृहात न थांबता कडू यांनी जलसंपदाचे अपर सचिव कपूर यांची भेट घेतली. त्यांना या मुलींची व्यथा समजावून सांगितली. अखेर अपर सचिवांनी, ९० टक्के अपंग रजनी मानकर हिला जलसंपदात नोकरी देण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे यापूर्वी जलसंपदा राज्यमंत्री असताना या अपंग मुलीला,डीसीपीएस मधून १० लक्ष रुपयांची मदत मिळवून दिली होती. अधिवेशनातील कामकाज नंतर,आधी अपंगाला आधार याचा प्रत्यय आ. कडू यांच्या कृतीतून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला.