आमदार बच्चू कडूंना नागपूरला हलवले, दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: January 11, 2023 05:38 PM2023-01-11T17:38:09+5:302023-01-11T17:39:08+5:30

बुधवारी सकाळी सहा ते ६.१५ वाजेच्या सुमारास बच्चू कडू हे कुरळपुर्णा येथून अमरावती येथील घरी आले

MLA Bachu Kadu shifted to Nagpur, case registered against two-wheeler driver | आमदार बच्चू कडूंना नागपूरला हलवले, दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

आमदार बच्चू कडूंना नागपूरला हलवले, दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next

अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा आमदारबच्चू कडू यांचा बुधवारी पहाटे अपघात झाला. अज्ञात भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. येथील खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर दुपारच्या वेळी त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, त्यांच्या डोक्याला चार टाके घालण्यात आले. कठोरा नाका ते कठोरा जकात नाक्यादरम्यानच्या आराधना संकुलापुढे हा अपघात घडला.
             
बुधवारी सकाळी सहा ते ६.१५ वाजेच्या सुमारास बच्चू कडू हे कुरळपुर्णा येथून अमरावती येथील घरी आले. वाहनातून उतरून डिव्हायडर पार करत रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. बच्चू कडू रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच, उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने त्याच मार्गावरील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, आ. कडू यांच्या चालक व खासगी सचिवाने धडक देऊन पळणाऱ्या त्या वाहनचालकाचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात तो देखील कोसळल्याची माहिती आहे. दुपारी आ. कडू यांना नागपूर येथे हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येथील रूग्णालयात सामान्यांसह राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची रिघ लागली होती.

बच्चू कडू कालच मुंबईहून अमरावतीत

विशेष म्हणजे बच्चू कडू मंगळवारीच मुंबईहून अमरावतीला आले होते. तर, मंगळवारी रात्री कुरळपुर्णा येथे गेले होते. अमरावतीत परततताच त्यांना अपघात झाला. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

अज्ञाताविरूध्द गुन्हा

याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आ. बच्चू कडू यांचे चालक गौरव भोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी वाहनधारकाविरुद्ध अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली. कठोरा मार्गावरील एका गृहसंकुलासमोर हा अपघात झाल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.

Web Title: MLA Bachu Kadu shifted to Nagpur, case registered against two-wheeler driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.