अमरावतीत ७० वी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा; तीन दिवस रंगणार कबड्डीचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 04:12 PM2023-02-16T16:12:49+5:302023-02-16T16:14:36+5:30
विदर्भातील ११ जिल्ह्यांतील मुला-मुलींच्या स्वतंत्र चमूंचा समावेश
अमरावती : येथील शोध प्रतिष्ठान आणि अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने १७, १८ व १९ फेब्रुवारी असे तीन दिवस अमरावतीच्या गाडगेनगरस्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगणात ७०वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आमदार चषक २०२३ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये ११ जिल्ह्यांच्या मुलामुलींचे एकूण ११ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत प्रथम व द्वितीय विजेत्यांना आकर्षक ट्राॅफी देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच मुले व मुलींचा राज्यस्तरीय संघ निवडला जाणार असून, हा संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळणार आहे. अशी माहिती आमदार सुलभा खोडके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिली. स्पर्धेच्या उद्घाटनाला अभिनेत्री सई मांजरेकर यांची विशेष उपस्थिती मुख्य आकर्षण राहणार आहे. मॅटवर कबड्डीचे सामने रंगणार आहेत.
शहरात कबड्डी स्पर्धेकरिता चांगला प्रेक्षक वर्ग लाभत असल्याने भव्यदिव्य स्वरूपात आयोजनाची संकल्पना मांडली आहे. प्रो-कबड्डीमधील अनेक खेळाडूसुद्धा विविध संघांमध्ये सहभागी होऊन कबड्डीचे कर्तब दाखविणार, अशी माहिती संयोजक यश खोडके यांनी दिली. यावेळी अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकूर, माजी महापौर ॲड. किशोर शेळके, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, ज्येष्ठ कबड्डीपटू राजाभाऊ देशमुख, डॉ. अजय बोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज राऊत, भोजराज काळे, ॲड. सुनील बोळे, नीलेश शर्मा, किशोर भुयार, प्रमोद महल्ले आदी उपस्थित होते.