आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा; माईक फेकून मारल्याची तक्रार, असं होतं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 09:04 PM2021-08-16T21:04:00+5:302021-08-16T21:07:07+5:30
भुयार आमदार नव्हते तेव्हाचे, म्हणजेच २०१३ मधील हे प्रकरण आहे. जिल्हा न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सोमवारी हा निर्णय दिला.
अमरावती - वरूड तहसील कार्यालयात शिरून तहसीलदारांना शिवीगाळ, मारण्याची धमकी व माईक फेकून मारत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांना स्थानिक न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भुयार आमदार नव्हते तेव्हाचे, म्हणजेच २०१३ मधील हे प्रकरण आहे. जिल्हा न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सोमवारी हा निर्णय दिला. (MLA Devendra Bhuyar sentenced to three months, know about case)
विधीसूत्रांनुसार, २७ फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन तहसीलदार राम लंके हे वरूड तहसील कार्यालयात काम करत असताना देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले. बाजार समितीमधील शासकीय ज्वारी केंद्र बंद का आहे, फोन का कट केला, अशी विचारणा करत भुयार यांनी त्यांना अर्वाच्च शिवीगाळ केली आणि माईकदेखील फेकून मारला, अशी तक्रार लंके यांनी नोंदविली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
युक्तिवादादरम्यान, शासकीय कामकाजात अडथळा हा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, भादंविचे कलम २८४ अन्वये दोन महिने सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास व कलम ५०६ अन्वये तीन महिने सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. तीनही शिक्षा एकत्रितरीत्या भोगावयाच्या आहेत. दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर नुकसानभरपाई म्हणून राम लंके यांना १० हजार रुपये देण्याचा आदेशदेखील न्यायालयाने दिला. अभियोक्ता सुनित घोडेस्वार यांनी सरकारची बाजू मांडली.