स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयारांची हकालपट्टी; फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली भावना, म्हणाले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 10:32 AM2022-03-25T10:32:16+5:302022-03-25T11:04:11+5:30
आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर, भुयार यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर आपल्या भावना व्यक्त करत पोस्ट केली असून ही पोस्ट चर्चेत राहिली.
अमरावती : मोर्शी - वरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. आमदार भुयार यांच्यावर पक्ष विचारसरणीला छेद देण्यात येत असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पक्षातून नारळ मिळाल्याच्या काही वेळानंतर भुयार यांनी फेसबुकवर 'धन्यवाद' म्हणत एक पोस्ट केली असून ही पोस्ट सर्वत्र चर्चेत राहिली.
जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा प्रवास अल्पावधीत गाठणारे देवेंद्र भुयार यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी नाराज असल्याची विश्वसनीय माहिती आहे. माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा धक्कादायक पराभव करून विक्रम नोंदविणारे आमदार देवेंद्र भुयार यांना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गुरुवारी भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे राजू शेट्टी म्हणाले.
गत काही महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्याही निर्णयाला आमदार भुयार हे जुमानत नव्हते. आमदार देवेंद्र भुयार हे महाविकास आाघाडी समर्थक म्हणून आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात ‘राजकीय’ बेबनाव झाला आहे. याचाही फटका आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बसत असल्याची माहिती आहे.
किंबहुना आमदार भुयार हे स्वाभिमानीचे अमरावती जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांना ते दुय्यम वागणूक देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी आमदार भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा असा प्रस्ताव राजू शेट्टी यांना दिला होता. त्यावरून गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे.