आमदार, खासदार निधी जिल्हा प्रशासनाला तातडीने उपलब्ध करून द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:25+5:302021-04-29T04:09:25+5:30
अमरावती: कोविड १९ ची स्थिती भयावह झाली असून, नागरिकांना मूलभूत सोईसुविधा मिळत नाही. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून, कोविड ...
अमरावती: कोविड १९ ची स्थिती भयावह झाली असून, नागरिकांना मूलभूत सोईसुविधा मिळत नाही. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून, कोविड उपाययोजनासंदर्भात आमदार, खासदार निधी जिल्हा प्रशासनाला तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अंबादास मोहिते यांनी केली आहे.
केंद्र व राज्य शासनाला पाठविलेल्या निवेदनात मोहिते यांनी कोविड १९ चे वास्तव शासनाकडे विषद केले आहे. जनतेच्या
आरोग्य सुविधा मिळण्याचा मूलभूत हक्क धोक्यात आला आहे. रुग्णालयांमध्ये बेडची अपुरी संख्या, व्हेंटिलेटर सारख्या सोयीसुविधांचा अभाव, औषध व रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनची आणि ऑक्सिजनची कमतरता, रुग्णवाहिका आणि शववाहिकांची कमी संख्या, लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाला केंद्राने दोन वर्षांचा खासदार स्थानिक विकास निधी तसेच राज्य शासनाने सुध्दा आमदार विकास निधी बीडीएसवर त्वरित उपलब्ध करून देणे गरजचे झाले आहे.
जिल्ह्यात रुग्णालय उभारणे, रुग्णालये अद्ययावत करणे, बेडची संख्या वाढवणे, व्यापक प्रमाणावर टेस्टिंग, औषधांचा व ऑक्सिजनचा पुरवठा व वाहतूक, रुग्णवाहिका आणि लसीकरण यावर जिल्हा प्रशासन तातडीने कामे करू शकेल. केंद्र शासनाने कोविड आपत्ती संदर्भात करावयाच्या उपाययोजनांसाठी २०२० व २०२१ या दोन वर्षांचा खासदार निधी न देण्याचा घेतलेला निर्णय परत घ्यावा. शासनाने आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता युध्दपातळीवर कामे होण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना हा निधी उपलब्ध करून द्यावा व खर्च करण्याचे पूर्ण अधिकार बहाल करावे, अशी विनंती अंबादास मोहिते यांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पारदर्शकपणे उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग करायला हवा असे देखील मोहिते यांनी पत्राद्धारे कळविले आहे.