अचानक ताप आल्याने आमदार रवी राणांना केलं होम क्वारंटाईन; शनिवारी होणार कोरोनाची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 10:30 PM2020-04-17T22:30:43+5:302020-04-17T22:32:18+5:30
कोरोनासाठीची तपासणीसाठी शनिवारी सकाळी आमदारांच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जाणार आहे.
अमरावती : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना गुरुवारी मध्यरात्रीनंतर अचानक ताप आला. गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी दिवसभर ताप उतरला नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय चिंतेत पडले आहेत. आमदार राणा यांच्यावर आनंद काकाणी हे अमरावतीतच उपचार करीत आहेत.
आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी सातत्याने दौरे केले. हा उपक्रम सुरू असतानाच गुरुवारी रात्री २ वाजता त्यांना ताप आला. १०३, १०४ या श्रेणीत ताप होता. त्यांना शरीरभर असह्य वेदना सुरू झाल्या. शिव्हरिंग होते. त्यांच्या अंगावर तब्बल दहा ब्लँकेट टाकल्यावर ते काहीसे स्थिर झाले. नवनीत राणा यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना याबाबतची माहिती दिली. डॉक्टर आनंद काकाणी यांना आमदार राणा यांच्या निवासस्थानी पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणी करून डॉक्टर काकाणी यांनी आमदार रवि राणा यांच्यावर औषधोपचार सुरू केला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आमदार राणा यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. औषधांना प्रतिसाद न मिळाल्यास त्यांना रुग्णालयात हलवावे लागेल, असा निर्णय डॉक्टरांनी घेतला. वृत्त लिहिस्तोवर आमदार राणा यांचा ताप कमी झालेला नव्हता. त्यांना अंगभर असलेल्या वेदनाही कायम होत्या. त्यामुळे रात्री त्यांना रुग्णालयात हलविले जाईल, अशी माहिती नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोनासाठीची तपासणीसाठी शनिवारी सकाळी आमदारांच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जाणार आहे. खासदार नवनीत यांचाही थ्रोट स्वॅब घेण्याचे वैद्यकीय सूत्रांनी ठरविले आहे. या नमुन्यांचे अहवाल चिंताजनक आले, तर संपूर्ण कुटुंबाचे नमुने तपासणीला पाठविले जातील.
आमदार राणा क्वारंटाइन
आमदार राणा यांना त्यांच्या राहत्या घरी वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. अर्थात त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कुणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही. शुक्रवारी दुपारी आमदार राणा यांची त्यांच्या निवासस्थानी दोनदा तपासणी करण्यात आली. ज्वर आणि अंगदुखी ही लक्षणे कायम होती.
मुंबईच्या डॉक्टरांचाही सल्ला
पतीच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे चिंताग्रस्त झालेल्या खासदार नवनीत यांनी गुरुवारच्या रात्रीच मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. कोरानाची लक्षणे त्यांनी विचारली. आमदार राणा यांना खोकला नाही; परंतु मुंबईत संबंधित डॉक्टरांनी इलाज केलेल्या काही रुग्णांना खोकला नव्हता. तरीसुद्धा ते कोविड-१९ पॉझिटिव्ह होते, अशी माहिती त्या डॉक्टरांनी दिली. कायम सावध असण्याचा आणि आवश्यक त्या सर्व चाचण्या करवून घेण्याचा सल्ला दिला.
आमदार राणा यांना गुरुवारी मध्यरात्रीपासून ताप आणि अंगदुखीचा त्रास आहे. 'व्हायरल इन्फेक्शन' किंवा 'हीट स्ट्रोक' असण्याची शक्यता आहे; परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलाइज्ड करण्याचा आणि कोरानासंबंधी चाचण्या करवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिव्हिल सर्जन यांनाही मी तशी माहिती दिली आहे. - डॉ. आनंद काकाणी, डायरेक्टर, रेडिएंट हॉस्पिटल, अमरावती.