'...तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत'; रवी राणांचं विधान, भाजपा अन् शिंदे गटात ठिणगी पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:29 AM2022-08-22T11:29:36+5:302022-08-22T11:31:22+5:30
अमरावतीत जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
अमरावती/मुंबई- महाविकास आघााडीचे भ्रष्ट सरकार गेले. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आले. मात्र येत्या २०२४मध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील. त्यासाठी जिवाची बाजी लावेन, अशी प्रतिज्ञा आमदार रवी राणा यांनी केली आहे.
विदर्भाचा विकास करायचा असेल, तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत, असे आमदार रवी राणा म्हणाले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही त्यांनी गौरव केला. तसेच अमरावतीत जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपाची सत्ता येईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
युवा स्वाभिमान पार्टीतर्फे, खा @navneetravirana व आ @mlaravirana_ysp यांच्या नेतृत्वात आज अमरावती येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात @BJP4Maharashtra अध्यक्ष @cbawankule, खा @RamdasTadasMP जी, खा @DoctorAnilBonde, @govindaahuja21 यांच्यासह उपस्थित होतो.#Maharashtra#Amravatipic.twitter.com/C9q9hfOPm8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 21, 2022
अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कमळ असेल, असा निश्चय बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, समुदायाला कमळ खुलविणार की नाही? असा प्रश्नदेखील विचारला. तेव्हा जय श्रीराम अशा युवकांनी गगनभेदी घोषणा देत होकार दर्शविला.
दरम्यान, राज्यात भाजपा पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता आगामी निवडणुकांकरिता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. त्यात २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपासाठी अटीतटीची आहे. या निवडणुकीत भाजपाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांना मिशन ४० प्लस देण्यात आले आहे. त्यात भाजपा राज्य संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले.
अलीकडेच देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. भाजपा राज्यात नंबर वन आहेच. परंतु पुढील सर्व निवडणुकांमध्ये भाजपाची ही ताकद कायम ठेवण्यासाठी आणि नंबर वन भाजपा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे असं सांगत बावनकुळे यांनी सूत्रे हाती घेतली.