आमदार रवी राणांची हिवाळी अधिवेशनाकडे पाठ, मंत्रिपद न मिळाल्याने कमालीचे नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:52 IST2024-12-18T11:48:19+5:302024-12-18T11:52:54+5:30
Amravati : मंत्रिपद न मिळाल्याने कमालीचे नाराज, रविवारी रात्रीपासून मुक्कामी, मंगळवारी शेतात गायींसोबत विरंगुळा

MLA Ravi Rana's back to the winter session
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने बडनेराचे आमदार रवी राणा हे कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राणा गत दोन दिवसांपासून अमरावतीत मुक्कामी आहेत. रवी राणा हे मंगळवारी चक्क शेतात गेले आणि गो सेवेत रमले. एवढेच नव्हे तर शेतात गायींसोबत विरंगुळा करीत असल्याचा व्हिडीओदेखील त्यांनी माध्यमांना पाठविला.
मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु असतानाच आमदार राणा यांनी नागपूर सोडले होते. ते रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अमरावतीत निवासस्थानी पोहोचले होते. गत दोन दिवसांपासून राणांनी अधिवेशनाकडे पाठ फिरविली आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीसाठी बडनेराची जागा सोडण्यात आली होती. बडनेरातून रवी राणा हे ६७ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यासोबतच पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यातून भाजपला पाच जागांवर विजय मिळवून देण्यात राणा दाम्पत्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राणा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, याबाबत रवि राणांना शाश्वती होती. त्यानुसार मोर्चेबांधणीदेखील त्यांनी केली होती, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. मात्र, रविवारी विस्तारापूर्वीच रवी राणांचे मंत्रिपदाच्या यादीतून नाव गायब झाल्याचे कळताच ते कमालीचे नाराज झाले. शपथविधी समारंभाला हजर न राहता राणांनी नागपूर सोडले नि अमरावती गाठले. मंगळवारी शेतात दिवस घालविला. गो सेवेला प्राधान्य देत जणू 'विस्तारा'वर कानाडोळा करण्याचा या माध्यमातून आमदार राणांनी प्रयत्न केला, असाच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव दिसून आला, हे विशेष.
होर्डिंग ठरले घातक?
गत आठवड्यात आ. रवी राणा यांचे भावी कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री असे लागलेले बॅनर्स जिल्ह्यातील अनेक धुरिणांना सल म्हणून बोचले. राणा मंत्री झाले तर आपले राजकीय अस्तित्व संपेल, असाच अनेकांचा समज झाला होता. मुख्यमंत्र्यांशी राणांची मैत्री असल्याने त्यांना मंत्रिपद मिळू शकते. हे हेरून राणाविरोधकांनी नागपूर येथे परिवारातून 'फिल्डिंग लावली अन् मंत्रिपदापासून रोखण्यात ते यशस्वी झाले, अशी माहिती आहे.