आमदारांनी स्वेच्छेने नाकारले नैसर्गिक आपत्तीचे अनुदान
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 21, 2023 04:56 PM2023-04-21T16:56:03+5:302023-04-21T16:56:43+5:30
श्रीकांत भारतीय यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, चांदूर बाजार तालुक्यात शेती
अमरावती : विधानपरिषदेचे आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत तारा पंडीत भारतीय मुळचे अमरावतीकर आहेत व त्यांची चांदूरबाजार तालुक्यातील देशमुख कुऱ्हा येथे ४३/१ मध्ये शेतजमीन आहे. या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचे नुकसान झाल्याने त्यांना शासन अनुदान मिळणार आहे. परंतू त्यापूर्वीच त्यांनी १९ एप्रिलला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना पत्र देऊन स्वेच्छेने शासन मदत नाकारली आहे.
सद्यस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्याने त्याअनुषंगाने शासनाकडून दरमहा वेतन मिळते. त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी पदावर कार्यरत असेपर्यंत राज्य शासनाकडून वेळोवेळी घोषित नुकसान भरपाई व अन्य मदतीचा लाभ आपणाला देऊ नये व शासन मदतीचा अपव्यय टाळावा, ही रक्कम शासनाकडून अन्य कुठल्याही लोकहिताचे कामासाठी वापरणे शक्य होणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी माजी महापौर चेतन गावंडेसह तुषार भारतीय, प्रशांत शेगोकर, बादल कुळकर्णी, प्रणित सोनी, संगम गुप्ता आदी उपस्थित होते.