आमदारांनी केली काँक्रीट रस्त्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:10 AM2017-11-26T00:10:14+5:302017-11-26T00:10:32+5:30
जिल्हा क्रीडा संकुलासमोरील रस्त्यावर योग्य पद्धतीने क्यूरिंग न केल्याने या रस्त्याचे भवितव्य काय, यासंदर्भाचे 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा क्रीडा संकुलासमोरील रस्त्यावर योग्य पद्धतीने क्यूरिंग न केल्याने या रस्त्याचे भवितव्य काय, यासंदर्भाचे 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली. याची दखल घेऊन अमरावती मतदारसंघाचे आमदार सुनील देशमुख यांनी शनिवारी तेथे भेट देऊन सदर रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या कामाचा अधिकाºयांकडून आढावा घेतला. कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्यात.
मुंबई येथील जेपीई इन्फ्रास्टक्चरने पंचवटी ते बडनेरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. हा रस्ता अत्याधुनिक मशीनद्वारे बनविण्यात येत आहे. त्याची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, उपअभियंता मिलिंद पाटणकर, उपअभियंता आशुतोष शिरभाते व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उपस्थित होते.
अभियंत्यांनी आ. देशमुख यांना रस्त्याच्या कामाची माहिती दिली. परंतु, या ठिकाणी क्रीडा संकुल असल्याने शहरातील अनेक मुले तेथे विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येतात. त्यांना क्रीडा संकुलात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथून यावे लागत आहे. ही कसरत त्यांना रोज करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम करताना योग्य नियोजन नसल्याने गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नागरिकांनाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काम करताना नागरिकांना वेठीस धरू नये, अशा सूचनाही यावेळी आमदार सुनील देशमुख यांनी केल्यात.
रस्ता काँक्रीटीकरणाचे काम चांगल्या प्रतीचे झाले पाहिजे, याची खबरदारी घ्या, असेही आ. देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी चर्चा करताना सांगितले. यावेळी अभियंत्यांसह नागरिकांची गर्दी जमली होती.
शेड बांधून अतिक्रमण करू नये
येथील क्रीडा संकुलात टायर कंपनीचे शोरूम आहे. त्याने फुटपाथवर अतिक्रमण करून टिनाचे शेड उभारले आहे. बाजूलाच गॅरेज असून, दुचाकी रस्त्यापर्यंत उभ्या राहतात. यामुळे फूटपाथ गडप झाला आहे, हे देशमुख यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मेकॅनिकला अतिक्रमण न करण्याबाबत बजावले. कारवाई करण्याची तंबीदेखील दिली. रस्त्याचे काम सुरू असल्याने लोकांना रस्त्यावरून चालता येत नाही. किमान त्यांना फूटपाथवरून तरी चालू द्यावे, असे सदर शोरूमच्या संचालकाला आ. देशमुख यांनी सुनावले.