रावळगाव-वाढोणा रस्त्यासाठी मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:31+5:302021-09-06T04:16:31+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे, आठ दिवसात रस्ता दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा आसेगाव पूर्णा : अचलपूर तालुक्यातील रावळगाव ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे, आठ दिवसात रस्ता दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
आसेगाव पूर्णा : अचलपूर तालुक्यातील रावळगाव ते वाढोणा (जहागीर ) फाटा या पोचरस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आठ दिवसांत सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह आसेगाव पूर्णा ते दर्यापूर मार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देण्यात आला.
असदपूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत रावळगाव वाढोणा (जहागीर) पोच रस्ता जिल्हा परिषद विभागाकडे येते. येथील ग्रामस्थांना दवाखाना, शिक्षण तसेच दळणवळण अशा आवश्यक कामांसाठ तालुक्याच्या ठिकाणासह आसेगाव पूर्णा येथे ये-जा करावी लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याने चालणाऱ्यांसह वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. सदर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर किरकोळ अपघातांची मालिका चालूच असून संबंधित विभागाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे या रस्त्याबाबत शुक्रवारी निवेदन देण्यात आले. यावेळी राज पाटील, महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, रोशन धांडे, पुरुषोत्तम काळे, गौरव बांते, सचिन बावनेर, वेदांत तालन, अभिजित वाकोडे उपस्थित होते.