रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्यमित्रांनी तयार केले आॅफलाइन मोबाइल अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 02:54 PM2018-02-24T14:54:51+5:302018-02-24T14:54:51+5:30
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती, रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता व आजाराविषयी अचूक माहिती मिळावी, यासाठी तिवसा व वलगाव येथील आरोग्यमित्रांनी पुढाकार घेत आॅफलाइन मोबाइल अॅप तयार केले.
सूरज दहाट/तिवसा (अमरावती) : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती, रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता व आजाराविषयी अचूक माहिती मिळावी, यासाठी तिवसा व वलगाव येथील आरोग्यमित्रांनी पुढाकार घेत आॅफलाइन मोबाइल अॅप तयार केले. त्यामुळे इंटरनेट नसतानाही आपल्या अँड्रॉइड मोबाइलवर काही क्षणातच संपूर्ण माहिती मिळणार आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालय व वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यमित्र मिलिंद गजभिये, प्रमोद बोराळकर, राजेश पुनसे, सतीश व-हाडे, मंगेश पुनसे यांनी काही दिवसांपूर्वीच रुग्णांच्या सेवेसाठी आॅफलाइन मोबाइल अॅप तयार केले. यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व माहिती आहे.
राज्यातील रुग्णालये, सुविधा, आजाराविषयी माहिती व संपूर्ण पत्ता या मोबाइल अॅपवर मिळणार आहे. विशेष म्हणजे, आॅफलाइन असल्याने या अॅपला इंटरनेटची आवश्यकता नाही. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पिवळे, केशरी, अन्नपूर्णा, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दीड लाखांच्या मर्यादेत वेगवेगळ्या ९७१ आजारांसाठी रुग्णालयांमार्फत मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात येते. एखाद्या रुग्णालयाने योजनेंतर्गत संलग्न रुग्णालयाची माहिती व जास्तीत जास्त लाभार्थी रुग्णांना लाभ मिळवून देण्याचा हा प्रयत्न असून, गोरगरीब जनतेला याचा फायदा होईल. शासनाकडे आम्ही हे अॅप सादर करून रुग्णांच्या सेवेसाठी खुले करणार आहोत,असे आरोग्यमित्र मिलिंद गजभिये यांनी सांगितले.