मोबाईल चोरीला गेला, वरून लाखभर रुपयेही गेले!
By प्रदीप भाकरे | Published: August 26, 2023 12:58 PM2023-08-26T12:58:05+5:302023-08-26T12:59:13+5:30
अज्ञात आरोपीविरूद्ध फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल
अमरावती : चोरीला गेलेल्या मोबाईलमधून सायबर भामटयाने सुमारे एक लाख रुपये काढून येथील एका शासकीय नोकरदाराची फसवणूक केली. १९ ऑगस्ट रोजी ती घटना घडली. याप्रकरणी प्रमोद धंदर (५५, रा. मोहननगर) यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीविरूद्ध फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कनिष्ट सहायक असलेले प्रमोद धंदर हे १९ ऑगस्ट रोजी कॉटन मार्केट परिसरातून भाजी खरेदी करत असताना त्यांचा मोबाईल चोरीला गेला. काही वेळाने त्या मोबाईलमध्ये असलेल्या धंदर यांच्या बॅंक खात्याशी संबंधित माहितीच्या आधारे त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये परस्पर डेबिट झाले. दोन तीन दिवसांनी ती बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाणे गाठले.