बार बंद करण्यासाठी एकवटल्या महिला
By admin | Published: May 6, 2017 12:05 AM2017-05-06T00:05:23+5:302017-05-06T00:05:23+5:30
स्थानिक पंचवटी ते आरटी कार्यालयाकडे जाणाऱ्या गॅलेक्सी बारमुळे या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गॅलेक्सी बारविरुद्ध रोष, मद्यपींचा वाढता धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक पंचवटी ते आरटी कार्यालयाकडे जाणाऱ्या गॅलेक्सी बारमुळे या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा बार त्वरित बंद करावा, अशी मागणी या परिसरातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे केली आहे.
ख्रिस्त कॉलनी, आयटीआय कॉलनी, परांजपे कॉलनी, अप्पर वर्धा जागृती कॉलनी परिसरातील गॅलेक्सी बारमध्ये दिवसेंदिवस मद्यपीचा धुमाकूळ वाढला आहे. या ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्यांमुळे या परिसरातील महिला, मुली, वृध्द यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच मद्यपी दुकानाबाहेर येवून रस्त्यावर मद्य सेवन करतात. याशिवाय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, वाद घालणे, स्थानिक नागरिकांच्या घराच्या भिंंतीवर लघुशंका करणे आदी अनेक प्रकार या ठिकाणी बिनबोभाटपणे सुरू असल्याने नागरिकांसह महिला-मुलींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा मार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने रोज शेकडो महिला-मुली व नागरिक या मार्गावरून ये-जा करतात. मद्यपींच्या त्रासामुळे स्थानिकांसह इतरांनाही मन:स्ताप सहन करावा लागतो, असे महिलांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
स्थानिक नागरिक तसेच महिला, मुली, वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या परिसरातील गॅलक्सी बार त्वरित बंद करावा अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुजाता झाडे, संध्या केला, कांता राठी, कविता बेलोरकर, सुभाष भावे, किरण भावे, रेखा भावे, सविता भावे, राधा तायडे, सुषमा येवतकर, शशीकला येवतकर, शिल्पा जोशी, अनिता जोशी, आरती बिजागिरे, नीता खडसे, वंदना चव्हाण, रिना शाह, आरती गुप्ता, वसुधा निशांद, प्रणिता भावे, वंदना देशमुख, नीता देशमुख, अनिता खडतकर, अरूणा देशमुख, वैशाली बिजवार, ज्योती कांडलकर,शुभागी बिजागिरे आदी महिलांनी दिला आहे.