आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे निर्देश
By admin | Published: May 29, 2014 11:32 PM2014-05-29T23:32:51+5:302014-05-29T23:32:51+5:30
अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा दि. २0 मे रोजी आयोगाने केली व त्या दिवसांपासून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी स्पष्ट केले.
अमरावती : अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा दि. २0 मे रोजी आयोगाने केली व त्या दिवसांपासून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी स्पष्ट केले. काही मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी याविषयी विचारणा केली असता आयुक्तांनी आयोगाद्वारा २१ मे रोजी प्राप्त झालेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागातील जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त नगरपालिका प्रशासन व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा २0 मे रोजी झाली; अधिसूचना २७ मे रोजी जारी झाली. २0 जून रोजी मतदान व २४ जूनला मतमोजणी होत आहे. निवडणूक घोषित झाल्याच्या दिनांकापासून विभागात आचारसंहिता लागू झाली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार ज्या बैठकीमध्ये शिक्षण संस्था व शिक्षकांविषयी चर्चा ठेवली असेल अशा कार्यक्रमात राज्याचे मंत्री, इतर राजकीय व्यक्तींनी बोलाविलेल्या बैठकीत निवडणूक कार्यालयाशी संबंधित व्यक्तीने उपस्थित राहू नये.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीमधून किंवा शासनाच्या निधीतून शिक्षण संस्था व शिक्षक यांच्याशी संबंधित विषयाचे किंवा कामाचे धोरणात्मक निर्णय करण्यात येऊ नये तसेच या विषयाशी संबंधित कामांना या कालावधीत मान्यता देऊ नयेत किंवा कामांचा शुभारंभ करण्यात येऊ नये. मतदारावर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती करण्यात येऊ नये असे आयुक्तांनी बजावले आहे. (प्रतिनिधी)