तीन वर्षानंतर मिळणार आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
By admin | Published: March 2, 2016 01:07 AM2016-03-02T01:07:03+5:302016-03-02T01:07:03+5:30
जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून पुरस्कार वितरणात खंड पडला होता.
जिल्हा परिषद : प्रशासकीय कारवाई सुरू, ५ एप्रिलचा मुहूर्त
अमरावती : जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून पुरस्कार वितरणात खंड पडला होता. अखेर यंदा या पुरस्काराला मुहूर्त मिळाला आहे. यासाठी प्रत्येक पंचायत समितीकडून ग्रामसेवकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने मागविले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या ५ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य घटक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय कामकाज उत्कृष्टरीत्या करणाऱ्या ग्रामसेवकांचा आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरव केला जातो. यासाठी ग्रामसेवकाने त्याच्या कर्तव्याच्या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेला २० कलमी कार्यक्रम, शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायत कर वसुली अशा विविध प्रशासकीय कामकाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हा परिषदेने सन २०११ मध्ये जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवकांचा गौरव केला होता. तेव्हापासून ग्रामसेवकांचे पुरस्कार वितरण झाले नव्हते.
मात्र आता सन २०१२ ते सन २०१५-१६ मधील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेमार्फत केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ पंचायत समितीमधून ग्रामसेवकांचे पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले आहेत. या पुरस्कारासाठी आतापर्यंत १५ प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक पंचायत समितीमधूृन एक याप्रमाणे १४ पुरस्कार जिल्हा परिषदेमार्फत दिले जाणार आहेत. सलग तीन वर्षांतील पुरस्काराचे वितरण येत्या ५ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. (प्रतिनिधी)