२५ वर्षांपासून ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेच नाही, निमकुंड ग्रामपंचायतीचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 08:49 PM2018-02-21T20:49:12+5:302018-02-21T20:49:22+5:30
अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे.
- नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे.
अचलपूर तालुक्यातील निमकुंड हे मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले छोटेसे टुमदार आदिवासी खेडे. १८६८ लोकसंख्या आणि बाराशेवर मतदान. नव्वद टक्क््यांहून अधिक कोरकू आदिवासी शेती आणि मजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत, तर समाजकल्याण विभागाची दहावीपर्यंत निवासी आश्रमशाळा. गावात विद्युत पथदिवे, गल्लीबोळात रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी, एक बोअर. नजीकच्या मल्हारा येथे आरोग्य उपकेंद्र असल्याने गावात डॉक्टर, परिचारिका भेट देवून तपासणी करतात आदी मूलभूत सुविधा भक्कम आहे.
सदस्य, सरपंचाची निवड गावबैठकीत
पूर्वी वझ्झर ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या निमकुंडला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा १९९४ पासून देण्यात आला. तेव्हापासून २०१५ पर्यंत पाच निवडणुका येथे झाल्यात. सर्व सदस्यांची अर्ज भरून अविरोध निवड झाल्यावर सरपंचपदासाठी आरक्षण पाहून निवड करण्याची प्रथा येथे आहे. सार्वत्रिक निवडणूक लागली की, संपूर्ण गावकरी आपसी हेवेदावे दूर सारित एकत्र येतात आणि आरक्षणानुसार सदस्याची निवड होते. जेथे एकापेक्षा जास्त उमेदवार दावा करतात, तेथे सर्वानुमते एकाचे नाव जाहीर होऊन बाकीचे माघार घेतात.
शासनाचा ना पुरस्कार, ना दमडी
मागील पाच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अविरोध निवडीचा नवा अध्याय या गावाने लिहिला आहे. मात्र, स्थानिक जिल्हा किंवा राज्य पातळीवर याची २५ वर्षांत दखलच घेतली गेली नाही. कधीकाळी अविरोध निवडणुकीसाठी लाखोंचा निधी देण्याची सत्ताधा-यांची घोषणा निमदरीसाठी पोकळी ठरली. साधे प्रमाणपत्र, अभिनंदन करण्याचे सौजन्य कोणी दाखविले नसल्याची खंत आहे.
२५ वर्षांत चार सरपंच
१९९४ ला नव्याने स्थापन झालेल्या निमकुंड ग्रामपंचायतीमध्ये २५ वर्षांत चार सरपंच झाले. ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांत एकूण नऊ सदस्यसंख्या आहे. विद्यमान सरपंच अनिल आकोले सलग दुसºयांदा अविरोध सरपंचपदी निवडल्या गेले. उपसरपंच अनिल धांडे, तर सदस्य जानकी भुसूम, सुनीता आठवले, निशा साकोमे, हिरालाल बेठे, शीला नागले असून, सचिव जी. व्ही. बेलसरे आहेत.
राज्यात आदर्श अशी आमची आदिवासी ग्रामपंचायत आहे. मागील २५ वर्षांपासून येथे मतदान झाले नाही. सदस्य, सरपंच, उपसरपंच निवड गावकरी सर्वानुमते ठरवितात. मात्र, शासनाची उदासीनता पाहता खंत वाटते.
- अनिल आकोले
सरपंच, निमकुंड, ता. अचलपूर.