पीकविम्यासाठी मोदींची सरपंचांना साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2016 12:16 AM2016-06-08T00:16:40+5:302016-06-08T00:16:40+5:30
सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतीपिकांचे नुकसान टाळून त्यांना आर्थिक मदत मिळावी, ...
जनजागृतीसाठी पत्र : आपत्तीत पिकांचे नुकसान टाळा
अमरावती : सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतीपिकांचे नुकसान टाळून त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्राच्या पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल जागृती व्हावी, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावगावच्या सरपंचांना पत्र पाठवून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्याला कृषीबिंदू मानून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी व त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व्हावी, यासाठी केंद्राने नुकतीच पंतप्रधान राष्ट्रीय पीकविमा योजना सुरू केली. यामध्ये पूर्वीच्या विमा योजनेतील अनेक जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व हंगामांसाठी एकच पीकविमा असल्याने प्रत्येक पिकाला याचा लाभ होणार आहे. त्यामुळे पिकनिहाय विमा काढण्याची आता गरज राहिली नाही. कोणत्याही भागातील शेतकरी खरीप व रबी हंगामासाठी पीक विम्याचा लाभ घेऊ शकतो. या प्रिमीअमपोटी शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे.
गारपीट, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ व पावसाअभावी शेतीपिकांचे नुकसान यासाठी पीकविम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गावपातळीवर या योजनेची जनजागृती व्हावी, यासाठी नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना साद घातली आहे.
नरेंद्र मोदी यांचे थेट पत्र सरपंचांना आल्यामुळे सरपंच भारावले आहेत. गावचे सरपंच हे त्या गावाच्या विकास कामांचे प्रमुख असतात. तसेच गावातील प्रत्येक गोष्टीच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन जाणे त्यांचे कर्तव्य आहे, याची जाणीव करून देणारा मोदी यांचा पत्रव्यवहार महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच गाव प्रमुखाला जर योजनेची माहिती करून दिली तर गावातील शेवटच्या घटकांपर्यंत ती माहिती पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)
पंतप्रधानांच्या पत्रामुळे सरपंच भारावले
पंतप्रधान कार्यालयाच्यावतीने गावोगावच्या सरपंचांशी थेट पत्रव्यवहार करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन सरपंचांना करण्यात आले आहे. देशाच्या प्रमुखांचे पत्र थेट ग्रामपंचायतींना आल्याने सरपंच भारावले आहेत.