आठ लाखांच्या लुटमारीतील आरोपींविरूद्ध ‘मोक्का’
By प्रदीप भाकरे | Published: April 5, 2023 04:36 PM2023-04-05T16:36:49+5:302023-04-05T16:38:52+5:30
कलम वाढ : टोळीप्रमुखांसह चार जणांना अटक
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल आठ लाख रुपयांच्या वाटमारी प्रकरणातील सात जणांच्या टोळीविरूद्ध ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. १८ मार्च रोजी दाखल गुन्ह्यात मोक्काअन्वये कलम वाढ करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली.
रविनगर येथील क्रिपालसिंग ठाकोर हा व्यापाऱ्यांकडून संकलित केलेले ८ लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना आरोपींनी दुचाकींनी येऊन त्याच्याकडून ती रक्कम हिसकावून पळ काढला होता. भुतेश्वर चौक भागातून जात असताना त्याला चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आले. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १८ मार्च रोजी जबरी चोरी व गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला होता. यात एकुण सात आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी आरोपी शेख मुन्नु शेख सलीम (३२, रा.चांदणी चौक, अमरावती), ईलीयास अली अहेमद अली (२४, बिसमिल्ला नगर अमरावती), सैय्यद समिर ऊर्फ गोविंदा सैय्यद जमीर (३०, रा. ताजनगर अमरावती) आणि तेजस संजय धोटे (२१, नमुना गल्ली) या चौघांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान यातील टोळीप्रमुख शेख मुन्नु शेख सलीम हा स्वत:सह टोळीतील सदस्यांचे आर्थिक लाभाकरीता वैयक्तीक व संघटितपणे स्वतः व टोळीतील संदस्यामार्फत गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. ती टोळी सक्रिय आहे. या टोळीतील सदस्यांविरुद्ध शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला बरेच गुन्हे नोंद आहेत. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्तांच्या परवानगीने मुळ गुन्हयात महराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम ‘मोक्का’ नुसार कलम वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांपुर्वी बडनेरा पोलिसांनी रोहन वानखडे खून प्रकरणात सहा आरोपींविरूद्ध मोक्का लावला होता.
यांनी केली कामगिरी फत्ते
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेडडी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या नेतृत्वात राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे, पोउपनि काठेवाडे, अंमलदार सागर सरदार, छोटेलाल यादव, ईश्वर चक्रे, नरेश मोहरील, मनिष कळंबे, रवि लिखीतकर, सागर भजगवरे, विक्रम देशमुख, उमेश उईके, विकास गुडधे यांनी ही कामगिरी केली. याप्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून, ते देखील मोक्काच्या अंतर्गतच आरोपी होतील.