अल्पवयीन युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:13+5:302021-06-24T04:10:13+5:30
अंजनगाव सुर्जी : १७ वर्षीय युवतीचा पाठलाग करून एकतर्फी प्रेम दर्शविणाऱ्या युवकाने रस्त्यात हाक पकडून विनयभंग केल्याची घटना २१ ...
अंजनगाव सुर्जी : १७ वर्षीय युवतीचा पाठलाग करून एकतर्फी प्रेम दर्शविणाऱ्या युवकाने रस्त्यात हाक पकडून विनयभंग केल्याची घटना २१ जून रोजी घडली. अंजनगाव पोलिसांनी गोलू ऊर्फ मृदुल प्रदीप कोकाटे (२१, रा. माळीपुरा) विरुद्ध २१ जून रोजी गुन्हा नोंदविला.
--------------
शाळेतील एलईडी टीव्ही लंपास
पथ्रोट : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वागडोह येथील जिल्हा परिषद शाळेतील एलईडी टीव्ही अज्ञाताने लंपास केल्याची घटना २१ जूनला उघडकीस आली. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पुनासे यांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
------------
दारूच्या पावटीने डोक्याला मारले
आसेगाव पूर्णा : रस्त्यावर बांधलेल्या बकऱ्या घरात नेताना स्पर्श होऊन दारूची बाॅटल खाली पडून फुटल्याने महिलेला शिवीगाळ करून त्याच बॉटलने डोक्यावर मारून जखमी केले. ही घटना पूर्णानगर येथे २० जून रोजी घडली. आसेगाव पूर्णा पोलिसांनी शेखर किरेकारविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
--------------
हिणवल्याने युवकाची आत्महत्या
मंगरूळ चव्हाळा : सतत हिणवले जात असल्याने युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा येथे घडली. २१ जून रोजी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विशाल महादेवराव भोसले (२४, रा. शिवरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------
इसमाला काठीने कपाळावर मारहाण
धारणी : जुन्या वैमनस्यातून शिवीगाळ करून इसमाला काठीने कपाळावर मारून जखमी केले. ही घटना तालुक्यातील गोंडवाडी येथे २१ जून रोजी घडली. मनीलाल कोंद्री धुर्वे (५५) यांच्या तक्रारीवरून फुलचंद किसन धुर्वे (रा. गोंडवाडी) विरुद्ध धारणी पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदविला.
------------
हॉटेलसमोर उभी केलेली दुचाकी लंपास
दर्यापूर : मूर्तिजापूर मार्गावरील एका हॉटेलपुढून फिरायला गेलेल्या युवकाची दुचाकी (एमएच २७ बी वाय ६०२८) ही अज्ञाताने लंपास केली. ही घटना १४ जून रोजी घडली. नीलेश बबनराव देशमुख यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, युवक जखमी
दर्यापूर : ट्रॅक्टरची दुचाकीला धडक लागल्याने दुचाकीस्वार गंभी जखमी झाल्याची घटना गणेशपूर फाट्याजवळ २० जून रोजी घडली. जखमीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी ट्रॅक्टर (एमएच २७ डी ६३९९) मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------
मांडवा येथे विवाहितेचा छळ
तिवसा : कोरोनाकाळात लग्न समारंभ झाल्याने अडीच लाखांचा खर्च वाचल्याने तो माहेरहून आणशील तेव्हाच वागवू, असा तगादा लावून छळ करण्ययात येत असल्याची तक्रार २७ वर्षीय विवाहितेने तिवसा पोलिसांत दिली. आकाश सुधाकर आरे, शोभा सुधाकर आरे, सुधाकर दादाराव आरे (सर्व रा. माडवा) विरुद्ध भादंविचे कलम ४९८ (अ), ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
-----------
विवाहितेचा विनयभंग
तिवसा : पतीपासून विभक्त असलेल्या महिलेला मद्यपीने लग्नाची गळ घालून हात पकडून विनयभंग केल्याची घटना २० जून रोजी तिवसा टाऊन येथे घडली. २७ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी २१ जून रोजी आरोपी विजय जानराव नेमाडे (३२) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------
ग्रामीण रुग्णालयातून दुचाकी लंपास
चांदूर बाजार : एमएच ३० एक्यू ९७७६ क्रमांकाची दुचाकी ग्रामीण रुग्णालयापुढून लंपास करण्यात आल्याची घटना २२ जून रोजी सकाळी ११ दरम्यान घडली. आनंद नारायण जुनारे (३३, रा. चांदूर बाजार) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २१ जून रोजी गुन्हा नोंदविला.
--------------
शेताच्या धुऱ्यावरून दुचाकी लंपास
शिरजगाव : देऊरवाडा शिवारात शेताच्या धुऱ्यावर उभी केलेली एमएच २७ सीडी ४९७८ क्रमांकाची दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची घटना २१ जून रोजी घडली. हरीश पुरुषोत्तम आमझरे (२४, रा. देऊरवाडा) यांच्या तक्रारीवरून शिरजगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
---------------
विधिसंघर्षित मुलीला पळवून नेले
शिरजगाव कसबा : बाहेरगावी शेजारी राहणाऱ्या बालकाने १७ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना २० जून रोजी दुपारी ४ वाजता घडली. ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------
इसमाच्या बँक खात्यातून ४० हजार काढले
मोर्शी : ६९ वर्षीय इसमाच्या बँक खात्यातून चारदा प्रत्येकी १० हजार रुपये काढल्याचा प्रकार १४ जून रोजी रामजीबाबानगरात घडला. ८९७५३१२००८ हा मोबाईल क्रमांक बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध मोर्शी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-----------
शेतमजूर महिलेवर अतिप्रसंगवरूड : शेतमजूर महिलेवर तीन वेळा अतिप्रसंग केला व वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वरूड पोलिसांत देण्यात आली. लिंगा शिवारात ही घटना घडली. वरूड पोलिसांनी वासुदेव श्यामराव शेंडे (६५, रा. लिंगा) विरुद्ध भादंविचे कलम ३७६, २ (एन) ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.