फुल्ल टगेगिरी; मुलीची छेड अन् तिच्याच घरासमोर धिंगाणा; सहा जणांविरूद्ध गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: June 29, 2023 05:25 PM2023-06-29T17:25:23+5:302023-06-29T17:25:57+5:30
दोघांना पकडले, धुडगुस घालणाऱ्यांमध्ये तिघे अल्पवयीन
अमरावती : ट्युशन संपवून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिची छेड काढण्यात आली. त्या प्रकाराचा जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या नातेवाईकाला शिविगाळ करण्यात आली. ते तीन रोडरोमिओ तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्याच्या घरासमोर जाऊन उभा धिंगाणा घातला. मुलीच्या कुटुंबियांच्या काळजात धस्स करणारी ती गोष्ट वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. २६ ते २८ जूनदरम्यान घडलेल्या त्या धुडगुस प्रकरणी वलगाव पोलिसांनी गौरव शिंदे (१८), रूपेश पोहोकार (२३), तुषार बोबडे (२०, तिघेही रा. वलगाव) व तीन विधीसंघर्षित बालकांविरूध्द विनयभंग, धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, २६ जून रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी ट्युशनवरून पायदळ घरी येत असतांना तीनही आरोपी व तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी तिचा पाठलाग केला. शिट्या वाजवून, इशारे करून गल्लीत चल तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणून तिच्याशी जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न केला. तिने जीव मुठीत धरून कसेबसे घर गाठले. तथा तत्काळ ती बाब कुटुंबियांना सांगितली. त्यावर तिच्या कुटुंबियांनी तीन आरोपींसह तीन विधीसंघर्षित बालकांना समजावून देखील सांगितले होते. दरम्यान २८ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तीनपैकी एक आरोपी समोर दिसताच मुलीच्या नातेवाईकाने त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने त्या नातेवाईकास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
‘त्याला टपकावयचे आहे’!
दरम्यान बुधवारी पिडिताचा नातेवाईक घरी आल्यानंतर तीन आरोपींसह तीन विधीसंघर्षित बालक पिडिताच्या घरासमोरील रस्त्याने समोर गेले व परत तिच्या घरासमोर आले. पिडिताच्या नातेवाईकाचे घर कुठे आहे? त्याला टपकवायचे आहे. असे म्हणत शिवीगाळ करून त्यांनी मारण्याच्या धमक्या दिल्या. पिडिताचे नातेवाईक तसेच मोहल्यातील इतर लोक त्यांना अडवायला आले असता शिवीगाळ व धमक्या देऊन ते तेथून पळून गेले.