कॉलेजकन्येचे शारीरिक शोषण; बळजबरीने पाजली दारू अन् सिगारेट !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 10:43 AM2023-02-09T10:43:27+5:302023-02-09T10:46:28+5:30
खंडणी उकळली, आरोपीला अटक : व्हिडिओ दाखवून अल्पवयीनाकडून विनयभंग
अमरावती : येथील एका अल्पवयीन कॉलेजकन्येला जंगलात नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. आरोपीची नराधमता एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याने तिला जबरदस्तीने चक्क दारू व सिगारेट देखील पाजली. हा अश्लाघ्य प्रकार २६ जानेवारीपूर्वी घडला असला, तरी याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तो उघड झाला. ती मुलगी लब्धप्रतिष्ठित घरातील असून, एका कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
यातील एक आरोपी २० वर्षांचा असून, दुसरा अल्पवयीन आहे. राजापेठ पोलिसांनी आरोपी शंतनू तायडे (२०, रा. रवीनगर, अमरावती) याला अटक केली आहे. राजापेठ पोलिसांनुसार, सध्या पीडिता ही १७ वर्षांची असून, सन २०२१ मध्ये तिची येथील एका अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. तो राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. त्या दोघांमध्ये ओळख झाल्यानंतर शैक्षणिक कामाच्या निमित्ताने त्याचे पीडितेच्या घरी येणे जाणे सुरू झाले.
त्यादरम्यान तिच्या घरी कुणी नसताना त्या अल्पवयीन मुलाने त्या अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखविले. त्याचवेळी तिचा अनेकवेळा विनयभंग देखील केला. त्यानंतर काही दिवसाने त्या अल्पवयीनाने तिला तिच्या कॉलेजसमोरून वाहनावर नेले. तथा तिला बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी नेऊन तिच्यावर शारीरिक बळजबरीचा प्रयत्न करण्यात आला. पुढे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यामुळे त्याने तिला त्रास देणे सुरू केले.
आरोपीची एन्ट्री, पीडितेला धमकावले
एका अल्पवयीनाने पीडितेशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, तो तिला त्रास देत असल्याची माहिती आरोपी शंतनू तायडे याला मिळाली. तो अल्पवयीन मुलगा व शंतनू हे परस्परांचे मित्र होते. बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुझ्याशी काय झाले, ते जगजाहीर करतो, अशी धमकी शंतनू याने अल्पवयीन पीडितेला दिली. तिला धमकावून तिच्याकडून काही रक्कम देखील उकळली. तिला प्रचंड त्रास दिला.
घटनेमुळे झाला मानसिक आघात
२६ जानेवारीपूर्वी आरोपी शंतनू याने त्या अल्पवयीन कॉलेजकन्येला बडनेरा हद्दीतील एका केंद्राजवळील जंगल परिसरात नेले. तेथे तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. तिला धमकावून दारू व सिगारेट देखील पाजली. त्या घटनेचा मुलीवर प्रचंड मानसिक आघात झाला. घरच्यांना त्या घटनेबाबत कसे सांगावे, हे देखील तिला सुचत नव्हते. अखेर तिने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिने ७ फेब्रुवारी रोजी रात्री पालकांसमवेत राजापेठ पोलिस ठाणे गाठले. सहायक पोलिस निरीक्षक प्रशाली काळे यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले.
१७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पैकी एक अल्पवयीन आहे. तर दुसऱ्याला अटक करण्यात आली. महिला एपीआय सखोल तपास करीत आहेत.
- मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ