वृध्देचा विनयभंग, चिंचोलीत दोन गट आमोरासमोर
By admin | Published: December 4, 2015 12:24 AM2015-12-04T00:24:38+5:302015-12-04T00:24:38+5:30
एका युवकाने ७० वर्षीय म्हातारीचा विनयभंग केला. म्हातारीच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीची धिंड : गावकऱ्यांनीही दिली पोलिसांत तक्रार
मोर्शी : एका युवकाने ७० वर्षीय म्हातारीचा विनयभंग केला. म्हातारीच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील आरोपीने एका गटातील काही लोकांविरूध्द मारहाणीची तक्रार दाखल केली. त्यावरून एकूण ७ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गावकऱ्यांनी आरोपीची धिंड काढणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाईची मागणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लावून धरली. ही घटना बुधवार दि. २ डिसेंबरला चिंचोली गवळी गावात घडली.
विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव विनोद हरणे, असे आहे. त्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून हेमंत नागले, धनराज नागले, उमेश नागले, तात्यासाहेब बागडे, शुध्दोधन पाटील, अजय पाटील आणि दिनेश तागडेविरुध्द मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलीस दप्तरी दाखल झालेल्या तक्रारीनुसार चिंचोली गवळी येथील ७० वर्षीय म्हातारी स्मशानभूमी परिसरात बुधवारी सरपण वेचण्याकरिता गेली असता आरोपी विनोद हरणे याने या म्हातारीचा विनयभंग केला.
बुधवारी याप्रकरणी मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. गुरूवारी पीडित वृध्देने पोलीस ठाण्यात आरोपी विनोद हरणेविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ५०४, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत प्रकरण नोंदविले असून आरोपीला अटक केली. दरम्यान आरोपी विनोद हरणे याने गावातील हेमंत नागले, धनराज नागले, उमेश नागले, तात्यासाहेब बागडे, शुध्दोधन पाटील, अजय पाटील, दिनेश तागडे आदींनी त्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. त्या आधारे मोर्शी पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुध्द भादंविच्या कलम १४३, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा नोंदविला. यातील आरोपींना अजून अटक व्हायची आहे. (तालुका प्रतिनिधी)
कायदा हातात घेणाऱ्यांविरुध्द कारवाईची मागणी
याप्रकरणी गावकऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दिली आहे. त्यात गावातील ६० ते ७० लोकांनी जाणीवपूर्वक आरोपीला बदडले आणि त्याची धिंड काढली. कायदा हातात घेऊन हा प्रकार केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे. यापूर्वीसुध्दा या लोकांनी गावातील एका पोलीस पाटलावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
शांतता समितीची सभा
याप्रकरणी गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, म्हणून ठाणेदार सुधीर पाटील यांनी शांतता समितीची बैठक आयोजित करून कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली. यापुढे अशी घटना पुन्हा घडणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
आरोपीच्या तक्रारीप्रमाणे त्याला मारहाण करणाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी या प्रकारात त्यांची चूक कबूल केली आहे.
- सुधीर पाटील, ठाणेदार, मोर्शी.
चिंचोली गवळी गावात घडलेली घटना निंदनीय आहे. भविष्यात अशी घटना घडू नये, याची काळजी घेऊ. गावकऱ्यांनीसुध्दा या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची ग्वाही दिली आहे. सध्या गावात शांतता आहे.
- दिलीप गवई, उपविभागीय पोलीस अधिकारी.