नणंदेकडून जिवे मारण्याची धमकी, दिराकडून विनयभंग; नवविवाहितेचा गर्भपातही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 11:51 AM2022-02-22T11:51:19+5:302022-02-22T11:58:44+5:30

महिलेचा ५ जानेवारी २०२१ रोजी विवाह झाला. तिच्या वडिलांनी आंदण म्हणून सर्व चैनीच्या वस्तू दिल्या होत्या. ती लग्नानंतर सासरी पांढुर्णा येथे गेली असता सासरच्या मंडळीने वस्तूंची व पैशांची मागणी करून तिला त्रास दिला.

molestation, torture, death threats to newly wed bride from to in-laws for dowry, charges filed | नणंदेकडून जिवे मारण्याची धमकी, दिराकडून विनयभंग; नवविवाहितेचा गर्भपातही

नणंदेकडून जिवे मारण्याची धमकी, दिराकडून विनयभंग; नवविवाहितेचा गर्भपातही

Next
ठळक मुद्देमुंबई, पांढुर्णा व्हाया नागपूर छळयात्रा

अमरावती : अगदी लग्न झाल्या झाल्याच तिचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळीपासून दूर गेलो की, तो थांबेल, या आशेपोटी ती पतीसोबत पांढुर्णा, नागपूर, मुंबईतदेखील राहिली. पतीसोबतच दीर, सासू, सासरे, नणंदेने तिचा इतका छळ केला की, तिला माहेर गाठावे लागले. सासरचे तेथेदेखील पोहोचले. झटापटीदरम्यान, तिच्या अंगावर कपडे असलेली बॅग फेकली. ती पोटावर लागल्याने तिचा गर्भपात झाला. अखेर मनाचा हिय्या करीत तिने १९ फेब्रुवारीला पोलीस ठाणे गाठले.

याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी विवाहितेचा पती, सासू, सासरा, नणंद अशा पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पांढुर्णा येथील मूळ रहिवासी असलेले पाचही आरोपी सध्या नागपूरमधील शिवशक्तीनगरचे रहिवासी आहेत. ५ जानेवारी २०२१ ते २८ ऑगस्ट २०२१ दरम्यान तो सर्व घटनाक्रम घडला.

तक्रारीनुसार, तक्रारकर्त्या महिलेचा ५ जानेवारी २०२१ रोजी विवाह झाला. तिच्या वडिलांनी आंदण म्हणून सर्व चैनीच्या वस्तू दिल्या होत्या. ती लग्नानंतर सासरी पांढुर्णा येथे गेली असता सासरच्या मंडळीने वस्तूंची व पैशांची मागणी करून तिला त्रास दिला. काही दिवसांनंतर ती मुंबई येथे राहायला गेली. वडिलाकडून हुंडा म्हणून एलएडी, एसी, वाशिंग मशीन घेऊन ये, असे म्हणत तिचा छळ करण्यात आला. पती घरी नसताना दिराने अश्लील चाळे करून विनयभंग केला. सासू, सासरा, दीर व नणंदेने तिला मारहाणदेखील केली.

मारहाण करून माहेरी सोडले

मुलीला त्रास होऊ नये म्हणून तिच्या वडिलांनी टीव्ही व रक्कमदेखील पाठविली. ती पांढुर्णा येथे सासरी आली. नणंदेने तिच्या गळ्यामध्ये ओढणी टाकूण जिवे मारण्याची धमकी दिली. ती पतीसोबत नागपूर येथे राहण्यास आली असता, पती, सासू व नणंदेने तिला बेदम मारहाण केली. सासरच्या मंडळीने तिच्या वडील व भावालादेखील शिवीगाळ केली. त्यानंतर तिला तिच्या वडिलांकडे अमरावतीला सोडण्यात आले. पती व सासरची मंडळी तेथेदेखील पोहोचली. तेथे मारहाणीदरम्यान फेकलेली बॅग पोटावर लागल्याने तिचा गर्भपात झाला. त्या अनन्वित छळाला कंटाळून अखेर शनिवारी तिने नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठले. सहायक पोलीस निरीक्षक कविता पाटील यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली.

पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती, सासू, सासरा, दीर व नणंद अशा पाच जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले. आरोपी हे पांढुर्णा येथील मूळ रहिवाशी असून सध्या नागपूर येथे राहतात. आरोपींच्या अटकेसाठी नागपूर येथे पथक पाठविण्यात येईल. कुणाचीही मुलाहिजा बाळगला जाणार नाही.

प्रवीण काळे, ठाणेदार, नांदगाव पेठ

Web Title: molestation, torture, death threats to newly wed bride from to in-laws for dowry, charges filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.