"आई, तुझ्या कुशीत विसावा घ्याचा आहे गं!" तरूणीचा गळफास, घरात आढळला मृतदेह
By प्रदीप भाकरे | Published: January 30, 2023 11:41 PM2023-01-30T23:41:42+5:302023-01-30T23:44:13+5:30
सुसाईड नोटवरील तारिख पाहता तिने २७ जानेवारी रोजी गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. योगिता अशोक जवंजाळ (२३) असे मृत तरूणीचे नाव आहे.
अमरावती : आई, जीवनाला कंटाळले गं, आता तुझ्याकडेच यायचे आहे, केवळ तुझाच सहारा आहे, तुझ्या कुशीत विसावण्यासाठी तुझ्याकडे येत असल्याचे लिहून ठेवत एका २३ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशियाड कॉलनीस्थित एका घरात हा प्रकार उघड.
सुसाईड नोटवरील तारिख पाहता तिने २७ जानेवारी रोजी गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. योगिता अशोक जवंजाळ (२३) असे मृत तरूणीचे नाव आहे.
पोलीस सुत्रानुसार, परिसरातील एका घरातून दुर्गंधी येत असल्याने काहींनी त्या दिशेने धाव घेतली असता, ती दुर्गंधी जवंजाळ नामक मुलीच्या घरातून येत असल्याचे स्पष्ट झाले. ती माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार आसाराम चोरमले दुपारी तीनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले असता, त्या घरात एका तरूणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. तिची ओळख योगिता अशोक जवंजाळ (२३) अशी पटविण्यात आली. पोलिसांना पंचनाम्यादरम्यान घटनास्थळाहून सुसाईड नोट मिळाली. त्यानुसार, तिने जीवनाला व एकाकीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
आईवडीलांविना पोरकी -
पोलिसांनुसार, योगिता हिच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तिला एक भाऊ असून तो नोकरीसाठी पुणे येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे योगिता ही घरी एकटीच राहत होती. तिच्या आईचे सन २०१६ मध्ये, तर वडिलांचे त्यानंतर निधन झाले. भाऊ पुण्याला राहत असल्याने ती एकाकी जगत होती. दरम्यान, २७ जानेवारी रोजी योगिता हिने राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास लावला. घटनेनंतर तीन दिवस हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही.
भावनिक पत्र -
दरम्यान, रविवारी योगिता हिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकाला बोलाविण्यात आले. आवाज दिल्यावर आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आत्महत्या करून तीन दिवस लोटल्याने तिचा मृतदेह कुजला होता. पंचनाम्यादरम्यान पोलिसांना योगिता हिने आत्महत्येपूर्वी मृत आईच्या नावे लिहिलेले भावनिक पत्र आढळून आले. 'आई, शेवटी मी तुझ्याजवळ येत आहे. मला तुझ्या पदरात घे, आईची माया दे, असे योगिता हिने या पत्रात लिहिले. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृताच्या भावाला त्याबाबत माहिती देण्यात आली.