आई, माफ कर, ‘आद्या’ला खूप शिकव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:00 AM2021-02-08T05:00:00+5:302021-02-08T05:01:02+5:30
धारणी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पती धारणी येथे रुजू होत असल्याने पत्नी किरण या रविवारी दुपारी मुलगी व सासऱ्यासह धारणीत पोहोचल्या. मात्र, त्यांचे कलेवर दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
पंकज लायदे
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : ‘आई, माफ कर’ असे लिहून सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. एका छोटाशा कागदावर पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून तांबे यांनी गळफास घेतला. पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष, तडफदार व निडर अधिकारी अशी ओळख असलेल्या तांबे यांच्या या आत्मघाती निर्णयाने सारेच अचंबित व शोकविव्हळ झाले आहेत.
धारणी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पती धारणी येथे रुजू होत असल्याने पत्नी किरण या रविवारी दुपारी मुलगी व सासऱ्यासह धारणीत पोहोचल्या. मात्र, त्यांचे कलेवर दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
तिघांचाही विलाप तेथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांचा कडा पाणावून गेला. पत्नी किरणचे तर भानच हरपले. अवघ्या ३४ वर्षांच्या कर्तव्यकठोर अधिकारी मुलाचे पार्थिव पाहून रमेश तांबे शून्यात हरविले. तर अबोध आद्या आईच्या कुशीत दडली.
नेमके काय झाले, अतुल यांनी आत्मघात का करून घेतला, याबाबत प्रत्येकजणाने शंका उपस्थित केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत तांबे कुटुंबीयांचे सांत्वन केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
नोकरीत खुप चुका; आद्याला शिकव
एपीआय अतुल तांबे यांनी पत्नी किरण हिच्या नावे मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात, ‘किरण, माझ्यामुळे नोकरी करताना खूप चुका झाल्या. नेहमी वाटायचे, तुला सांगावे, पण, शक्य झाले नाही. आज टोकाचा निर्णय घेताना आई, बाबा, तुझा व आद्याचा चेहरा समोर येतोय. कदाचित मी केलेल्या चुकीची किंमत माझे आयुष्य असेल. खूप विचार केला, पण काय करावे, हे समजत नाही. आद्याला खूप शिकव. मलाच सर्व बघायचे होते, पण आता शक्य नाही. झालेच तर माफ कर. तुमची सर्वांची काळजी वाटते. शेवटच्या क्षणी काय करावे, काय लिहावे, हे कळत नाही, जय गजानन, असे चिठ्ठीत नमूद आहे.
साखरी येथे काय घडले?
पती अतुल हे या आधी धुळे जिल्ह्यातील साखरी येथे कार्यरत होते. तेथून गतवर्षी त्यांना फोन कॉल आले होते. त्यावेळी त्यांनी ते प्रकरण निपटवले होते. मात्र, ते प्रकरण नेमके काय, त्याची माहिती आम्हाला नाही. दोन दिवसांआधीदेखील त्यांना तेथील माहिती देण्याकरिता फोन आला होता. तेथीलच कामाचा काही ताण असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका किरण तांबे यांनी ठाणेदार विलास कुलकर्णी यांचेकडे व्यक्त केली. त्या दृष्टीने तपास करण्याची विनंतीदेखील त्यांनी ठाणेदारांना केली