अन् क्षणातच रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:11 PM2017-10-10T23:11:34+5:302017-10-10T23:11:52+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी गुरुकुंजात जमली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महासमाधीस्थळी एकच गर्दी असल्याने वाहतूक वारंवार अवरूद्ध झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा/ गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी गुरुकुंजात जमली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महासमाधीस्थळी एकच गर्दी असल्याने वाहतूक वारंवार अवरूद्ध झाली. मौन श्रद्धांजलीच्या काही क्षणापूर्वी महामार्गावरून जाणाºया एका रुग्णवाहिकेसाठी गुरुदेव भक्तांनी क्षणातच शिस्तबद्धपणे संपूर्ण मार्ग मोकळा केला. अन् खºया अर्थाने मानवतेचा परिचय देत राष्ट्रसंतांच्या विचाराला कृतीतूनही श्रद्धांजली वाहिली.
राष्टÑसंतांना मौन श्रद्धांजली अर्पित केल्यानंतर महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर समाजउत्थानासाठी काम करण्याची प्रेरणा घेऊन जाण्याचा हा सोहळा असल्याचे उपस्थित लाखोंच्या संख्येतील गुरुदेव भक्तांनी सांगितले. याचाच परिचय देत गुरुदेवभक्तांची शिस्तबद्धता एका प्रसंगाने अनुभवास आली. मौन श्रद्धांजलीच्या काही क्षणापूर्वीच अमरावती मार्गाने एक रुग्णवाहिका आली. राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड गर्दीने तिचा वेग मंदावला, रुग्णवाहिकेचा सायरण वाजत होता. अन् क्षणातच लाखोंच्या अलोट गर्दीने क्षणात महामार्ग मोकळा केला. यामुळे भारावलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने हात उंचावित गुरूदेव भक्तांचे आभारही व्यक्त केले.
गुरुदेव भक्तांनी आपल्या गुरुमाऊलीच्या पालखीसह टाळ-मृदंगाच्या गजरात ‘जय मंगल गुरूदेव हमारे, तुम्हारे दर्शन में सुख सारे’ असे म्हणत भारताच्या कानाकोपºयातून श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमासाठी लाखो लोक सकाळपासूनच गुरुकुंजात दाखल झाले होते.