आरटीईसाठी सोमवारी शेवटची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:12 AM2021-01-17T04:12:49+5:302021-01-17T04:12:49+5:30
अमरावती : राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेशासाठी पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रवेश प्रक्रियेला सहाव्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण ...
अमरावती : राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेशासाठी पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रवेश प्रक्रियेला सहाव्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार सोमवार, १८ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा यादीतील पालकांना पाल्यांचा प्रवेश निश्चिती करता येणार आहे.
बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण आरटीई कायद्यान्वये राज्याची ९ हजार ३३१ खासगी शाळांमधील १ लाख १५ हजार ४७७ जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. बालकांच्या उदासीनतेमुळे वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यासह राज्यभरात ८६ हजार ४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही २९ हजार ४३७ जागा रिक्त आहेत. यात जिल्ह्यात २४३ शाळांमध्ये २४८६ जागांसाठी ९००३ अर्ज आले होते. त्यापैकी २४५६ विद्यार्थ्यांची सोडतीत निवड झाली आहे. त्यामधून १६५९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर सध्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश दिल्या जात आहे. रिक्त जागांवर प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. अनलॉकनंतर प्रक्रियेने वेग घेतला. मात्र, शाळा कधी सुरू होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम कायम राहिल्याने पुन्हा प्रवेशाचा वेग मंदावला असून जुलै ते जानेवारीत निम्यापेक्षा अधिक प्रवेश झाले आहेत. दरम्यान शाळांमध्ये शिल्लक रिक्त जागानुसार पालकांना एसएमएसव्दारे प्रवेशाचा दिनांक पाठविला जात आहे. मात्र, पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता वेळोवेळी चौकशी करावी तसेच निर्धारित वेळेत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.