सोमवार ‘कत्ल की रात’
By admin | Published: February 20, 2017 12:02 AM2017-02-20T00:02:00+5:302017-02-20T00:02:00+5:30
महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रविवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यात. मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होईल.
छुप्या बैठकी : उमेदवारांमध्ये पडद्याआड ‘सेटिंग’ची शक्यता
अमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रविवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यात. मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. त्यापार्श्वभूमीवर सोमवारची रात्र ही उमेदवार आणि त्यांच्या सर्मथर्कांसाठी ‘कत्ल की रात’ ठरणारी आहे. आता छुप्या बैठकांचे सत्र सुरु होईल. उमेदवारांमध्ये पडद्याआड आपसी समझोता करण्यासाठी देखील सोमवारची रात्र निर्णायक ठरेल. या रात्रीकालिन बैठकींचे काय फलित निघाले, हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल.
यावेळी एकाच दिवशी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान होत आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या प्रचारासाठी येताना बड्या नेत्यांना अडचणी आल्या आहेत. सामाजिक कार्य, विकास कामे, भष्ट्राचार, राजकीय पक्षांचे ध्येय व उद्दिष्ट आणि विचारसणीच्या आधारे अनेक उमेदवारांनी प्रचाराचा मुद्दा बनविला होता. महापालिका निवडणुकीत ८७ जागांसाठी ६२८ उमेदवार रिंगणात आहेत. यानिवडणुकीत उमेदवारांनी ८ फेब्रुवारीपासून प्रचाराला सुरूवात केली. यासाठी त्यांना ११ दिवस मिळाले. जिल्हा परिषदेत ५९ जागांसाठी ४२२ उमेदवार तर पंचायत समितीच्या ८८ जागांसाठी ५३१ उमेदवार रिंगणात आहेत. १५ फेब्रुवारीपासून ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा सुरु झाली. चार दिवसांनंतर रविवारी प्रचारतोफा थंडावल्या आहेत. यानिवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी अल्प कालावधी मिळाला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये उमेदवार मतदारांच्या भेटीकरिता पोहोचू शकले नाहीत. मात्र, अशा गावांमध्ये उमेदवारांच्या समर्थकांनी किल्ला लढविल्याचे चित्र आहे.
रविवारी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार तोफा शांत झाल्यानंतर आता सोमवारी रात्री विजयाचे गणित जुळविण्यासाठी छुप्या बैठकांचे सत्र सुरु होईल. महत्वाची व्यक्ती अथवा स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरुन तो परिसर काबीज करण्यासाठी राजकीय खेळी सोमवारच्या रात्री होईल, असे संकेत आहेत.
छुप्या बैठकींमध्ये उमेदवारांकडून सौदेबाजी, मतांचा व्यवहार, लक्ष्मीदर्शन, दारुपार्ट्या, उमेदवारांची माघार घेणे, पैशांची देवाण-घेवाण, अफवा पसरवून मतांची टक्केवारी वाढविणे, जाती-धर्माचे समीकरण जुळवून आणणे आदी क्लृप्त्या लढविल्या जातील. काल-परवापर्यंत एकमेकांसोबत प्रचार करणाऱ्या उमेदवारांना एका रात्रीतूनच दूर करण्याची राजकीय खेळी करण्यात देखील उमेदवारांचे समर्थक मागेपुढे बघणार नाहीत, अशी चर्चा जाणकार करीत आहेत. काही उमेदवारांच्या हमखास विजयासाठी नेत्यांकडून मोठी सौदेबाजी होण्याची शक्यता आहे.
सोमवारच्या रात्री नाकाबंदी
सोमवारच्या रात्री निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांकडून मद्यपुरवठा, पैशांची आवक, शस्त्रसाठा येण्याची दाट शक्यता पोलीस विभागाने वर्तविली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा व शहराच्या सीमेवर सोमवारी रात्री नाकाबंदी केली जाणार आहे. मध्यप्रदेशातून दारू येणार असल्याची माहिती असून त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदीच्या माध्यमातून मोर्चेबांधणी चालविली आहे.
संवेदनशील प्रभागांवर नजर
महानगरात काही प्रभाग पोलिसांनी संवेदनशील घोषित केले आहेत. निवडणुकीच्या दिवशी याप्रभागात कायदा व सुव्यस्थेची स्थिती निर्माण होण्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली आहे. त्यानुसार याप्रभागांना सोमवारी रात्रीपासूनच पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. मुस्लिमबहुल भागात हे चित्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकेल.