सोमवारपासून फक्त गुरूजींसाठीच वाजणार शाळेची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:56+5:302021-06-28T04:09:56+5:30
विद्यार्थ्यांचा फोटो टाकणे ऑफलाईनवर निर्भर, तालुक्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ऑनलाईन चांदूर बाजार : कोरोनामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठी शाळा ...
विद्यार्थ्यांचा फोटो टाकणे
ऑफलाईनवर निर्भर, तालुक्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ऑनलाईन
चांदूर बाजार : कोरोनामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही संभ्रमच कायम आहे. असे असले तरी दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील शाळा, २८ जूनपासून विद्यार्थ्यांविनाच सुरू होणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा विचार करता, सोमवारपासून फक्त गुरुजींसाठीच शाळेची घंटा वाजणार आहे. परिणामी शिक्षकांना हे वर्षही विद्यार्थ्यांविनाच काढावे लागेल की काय, अशी शंका निर्माण होत आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे पूर्ण शैक्षणिक सत्र, शिक्षणाविनाच पार पडले. नाही म्हणायला, ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यातून विद्यार्थ्यांच्या पदरी किती ज्ञान पडले, हे फक्त राज्याच्या शिक्षण विभागालाच माहीत. कारण जे ऑनलाईन होते ते, जे ऑफलाई होते. असे पहिली ते बारावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थ्यी पुढील वर्गात प्रमोटेड झालेत. त्यांच्या ज्ञान संपादनाची कोणतीच कसोटी तपासली गेली नाही. त्यामुळे अव्वल येणारा विद्यार्थी व नापास होणारा विद्यार्थी यावर्षी ढकलगाडीने पुढील वर्गात जात आहे. परिणामी दोघांचाही ज्ञानाची दर्जा समान झाल्यामुळे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना यावर्षी कौतुकापासून वंचित राहावे लागणार आहे.
यावर्षीच्या सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात अद्यापही शिक्षण ऑनलाईन किंवा ऑफलाईनवरच निर्भर राहाणार आहे. त्यामुळे यंदाही तालुक्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांचे, शौक्षणिक भवितव्य अधांतरीच आहे. यावर्षी १० वी व १२ वीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे या दोन्ही वर्गांचा निकाल कोणत्या निकषांवर लावावा. याबाबत राज्याचा शिक्षण विभाग, अद्यापही निर्णय घेऊ शकला नाही. त्यामुळे पाल्याचे पुढील शैक्षणिक भवितव्य काय? याबद्दल पालकवर्ग कमालीचा चिंतेत आहे.
कोट
२८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी शाळानिहाय नियोजन तयार केले आहे. त्यानुसार जेथे शक्य तेथे ऑनलाईन अभ्यासाचे नियोजन करण्यात आले आहे. जेथे ऑनलाईन शक्य नाही तेथे ऑफलाईनचे नियोजन शिक्षकांनी केले आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने स्थानिक पातळीवर या शैक्षणिक सत्राचे निर्णय घेण्यात येतील.
- शुभांगी श्रीराव, गट शिक्षणाधिकारी
कोट २
पहिली ते चौथीचे प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक इमारतीचा बेस आहे. मागील वर्षी कोरोनामुळे प्राथमिक शिक्षण पाण्यात गेले. यावर्षीही तीच स्थिती कायम राहिल्यास प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ होईल. बेसच पक्का नसला तर, विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी कसे तयार होतील?
-विक्रम देशमुख,
पालक, गणोजा