चोरट्यांचा अनोखा फंडा; दानपेटी न फोडता महिनाभर काढले पैसे, मग केले असे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 02:39 PM2022-06-10T14:39:59+5:302022-06-10T14:49:57+5:30
चौकशीदरम्यान, चोरट्यांनी सांगितलेली पद्धत ऐकून पोलीसदेखील अवाक् झाले.
अमरावती : चोरीच्या विविध घटना आपण ऐकल्या असतील. चोर नव-नवीन शक्कली लढवून चोरी करतात. अशीच एक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. चोरीसाठी अवलंबलेली पद्धत पाहून पोलीसदेखील अवाक् झाले.
फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींनी भीमटेकडी येथील विहारामधील दानपेटी फोडल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३० हजार ६०० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दानपेटी फोडण्यापूर्वी आपण त्या दानपेटीमध्ये च्युईंगम लावलेली लोखंडी पट्टी टाकत होतो. त्याला नोट चिकटल्यानंतर ती दानपेटीतून काढत होतो. सुमारे महिनाभर तसे केल्यानंतर एकदाची ती दानपेटी फोडून टाकल्याची कबुली त्या दोघांनी गुरुवारी दिली. चौकशीदरम्यान, चोरट्यांनी सांगितलेली पद्धत ऐकून पोलिसही विचारात पडले.
सुशील देवानंद चिंचखेडे (२०) व अश्विन ऊर्फ आशु विजय रामटेके (२०, दोघेही रा. उत्तमनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ३ जून रोजी सकाळी भीमटेकडी येथील विहारामधील दानपेटी फोडून सुमारे ५० हजार रुपये लंपास करण्यात आल्याची बाब उघड झाली होती. या प्रकरणी भारत शहारे यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान चिंचखेडे व रामटेकेला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या अवलंबिताच दोघांनीही त्या चोरीची कबुली दिली.