हो...ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत देखील मिळते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:52 PM2021-12-15T17:52:57+5:302021-12-15T17:58:24+5:30
शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याने ऑनलाईन फसवणुकीच्या तीन घटनांमधील ८८ हजार ६०१ रुपये इतकी रक्कम परत मिळवून दिली. यामुळे ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत मिळते, असा विश्वास देण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
अमरावती :ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर गमावलेले पैसे परत मिळविण्यासाठी पहिले काही तास हे ‘गोल्डन अवर’ समजले जातात. या ‘गोल्डन अवर’मध्ये नागरिकांनी ऑनलाइन फसवणुकीची माहिती दिल्यास त्याचा तातडीने छडा लावता येतो. त्यातून नागरिकांना त्यांची गेलेली रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याने ऑनलाईन फसवणुकीच्या तीन घटनांमधील ८८ हजार ६०१ रुपये इतकी रक्कम परत मिळवून दिली. त्यामुळे हो...ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत देखील मिळते!, असा विश्वास देण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ही बाब लक्षात घेऊन ऑनलाइन फसवणुकीची माहिती नागरिकांना तत्काळ द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले आहे. विशेष म्हणजे ज्या तीन घटनांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली, ते प्रकरण जॉब, कर्ज व हेल्थ केअर अशा भिन्न स्वरूपाची आहेत.
अशी झाली फसवणूक
१) महावीरनगर येथील आदित्य कछवाह यांनी इन्स्टाग्रामवरील जाहिरात पाहून जॉबसाठी अप्लाय केला. पलीकडून इंडिगो एअरलाईन्समध्ये नोकरी लागल्याची बतावणी करून त्यांना २३ हजार १०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. तांत्रिक तपास करून ती रक्कम परत मिळवून देण्यात आली.
२) नांदगाव पेठ येथील तनवीरखान अहमद खान यांनी फेसबुकवर बजाय फायनान्सची जाहिरात पाहून कर्जासाठी अर्ज भरला. आरोपींनी कॉल करून कर्ज मंजू झाल्याची बतावणी केली. रजिस्ट्रेशन, टीडीएस अशी वेगवेगळी कारणे सांगून २५, ५०१ रुपये लुबाडण्यात आले.
३) भाजीबाजार येथील इर्शादखान यांना एका अज्ञाताने कॉल करून आयुर हेल्थ केअरची डिस्ट्रीब्यूटरशिप देण्याचे आमिष दाखविले. त्यांना ४० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. मात्र, हाती काहीच आले नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाणे गाठले.
असे आले पैसे परत
सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी तीनही गुन्ह्यांमधील ट्रान्झॅक्शनचा अभ्यास केला. तांत्रिक पद्धतीने तपास करून संबंधित नोडल अधिकाऱ्यांना तत्काळ मेल करण्यात आले. त्यामुळे तीनही घटनांमधील ८८ हजार ६०१ रुपये परत मिळविण्यात आले.