माकडाने ढकलल्याने मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:23 PM2019-03-06T22:23:26+5:302019-03-06T22:23:50+5:30
माकडे हाकलण्यासाठी छतावर चढलेल्या नऊ वर्षीय मुलाचा ढकलल्याने डोक्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली.
मोर्शी : माकडे हाकलण्यासाठी छतावर चढलेल्या नऊ वर्षीय मुलाचा ढकलल्याने डोक्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली.
शहरातील नंदास्मित कॉलनीतील मीत जावरे (९) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी वडील शेतात गेल्यानंतर मीत हा आईसोबत घरी होता. यादरम्यान परिसरात माकडे आली. त्यांना हाकलण्यासाठी परिसरात फटाके फोडले जात होते. ते बघायला मीत हा दोन मजली घराच्या छतावर गेला.
त्याच्या पुढ्यात एक माकड होते. त्यांना हाकलण्याकरिता तो सरसावला असता, माकडाने त्याला ढकलले. यामुळे दोन मजली दोन मजली इमारतीवरून खाली कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तो अत्यवस्थ असल्याने डॉक्टरांनी त्याला अमरावतीला नेण्यास सांगितले. अमरावतीला एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, ५ मार्चच्या मध्यरात्री १२:३० वाजता त्याचे निधन झाले.
जावरे कुटुबीयांचा तो एकुलता मुलगा असून, एका इंग्रजी शाळेत तिसऱ्या वर्गाला शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण आहे.
माकडांचा बंदोबस्त करा
जंगलात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे माकडे नागरी वस्तीकडे वळली. त्यांच्यामुळे जीवितहानी होऊ शकते, हे या घटनेने सिद्ध केले. यामुळे वनविभागाकडून माकडांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.