पाऊस लांबल्यामुळे ‘मान्सून सूचक’ धोक्यात..!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:05 PM2019-07-17T18:05:58+5:302019-07-17T18:09:17+5:30
मृग नक्षत्राचा संकेत अर्थात मान्सूनची नांदी देणारे गोसावी व इतर कीटकांचे आयुष्य पावसाअभावी धोक्यात आले आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
अमरावती - मृग नक्षत्राचा संकेत अर्थात मान्सूनची नांदी देणारे गोसावी व इतर कीटकांचे आयुष्य पावसाअभावी धोक्यात आले आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मुख्य ‘मृगाचा काळा कीडा’ व ‘गोसावी’ यंदा दृष्टीस पडला नाही. त्याचवेळी गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे.
मृगाची सुरुवात होताच ग्रामीण भागात ‘काळा कीडा’ दिसतो. त्यावरून मृगाच्या पावसाचे संकेत शेतकऱ्यांना मिळतात. अवकाळी पाऊस व मृगाचा पाऊस यातील फरक या कीटकसृष्टीच्या अस्तित्वातून सहज लक्षात येतो. मृगाच्या पहिल्या पावसानंतर ओल्या मातीवर चालणारा, भगव्या रंगाचा अन् धोक्याचा स्पर्श होताच पाय मिटवून चेंडूसारखा गोल करून बसणारा मखमली ‘रेड वेल्वेट माईट’ यंदा दृष्टीस पडला नाही. ग्रामीण भागात त्याला ‘गोसावी’ किंवा ‘साधू’ नावानेही ओळखले जाते. विशेषत: विदर्भात त्याला ‘राणी ‘कीडा’ देखील म्हटले जाते. पावसाळ्यात ओल्या मातीवर चालणारा हा कीटक त्यानंतर केवळ चार महिने दिसतो आणि नंतर सुप्तावस्थेत जातो.
कृषी-परिस्थितीमध्ये वाढते रसायन व औषधामुळे अनेक सूक्ष्मजीव व कीटकांचे जीवन धोक्यात सापडले आहे. काही वर्षात शेतीत रासायनिक खाते व कीटकनाशके यांचा वाढता वापर यांच्या जीवावर बेतत आहे. पहिल्या पावसानंतर शेती व जंगल परिसरात गोसावी आढळून येतो. हा कीटक अतिशय संवेदनशील असून धोक्याचा स्पर्श होताच एकदम निर्जीव होऊन शांत बसतो. जणू काही मेलाच की काय, असे भासवतो. कुजलेल्या पानाचे बारीक कण व लहान सूक्ष्मजीव याचे मुख्य खाद्य आहे. याचे आयुष्य अवघे चार महिन्यांचे असते. पावसाळी हंगामापुरते आपले अस्तित्व असणारे हे कीटक दिवसेंदिवस कमी होत आहेत. शेतीसाठी किंवा कोणत्याही पिकासाठी हा धोकादायक नसून, हा पूर्णत: निरूपद्रवी आहे. काही वर्षांत याची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.
निसर्ग अन्नसाखळी असुरक्षित
परिसंस्थेतील अन्नजाळ्यात कीटक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कीटक हे पक्षी, साप, सरडे यांचे मुख्य खाद्य आहेत. अन्नसाखळी समृद्ध असेल तरच जैवविविधता समृद्ध राहते. रसायने व वाढता कीटकनाशकांचा वापर जैवविविधतेसाठी जीवघेणा ठरला असल्याची बाब अमरावती येथील वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पाऊस लांबला की सूक्ष्मजीवांचे संवर्धन होत नाही. पिकांसोबत मैत्रीचे नाते सूक्ष्मजीवांचे असून, ते कमी होत असल्याने पिकांची वाठ खुंटते. हवामानाच्या आद्रतेवरीही परिणाम होतो. पावसाळात भूतलावर येणारे सूक्ष्मजीव हे शेतकऱ्यांचे मित्र असतात.
- एन. व्ही. फिरके, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र अमरावती विद्यापीठ