पाच वर्षांत मान्सून पहिल्यांदाच उशिरा
By Admin | Published: June 28, 2014 12:19 AM2014-06-28T00:19:02+5:302014-06-28T00:19:02+5:30
मागील पाच वर्षांमध्ये २००९ साली पाऊस कमी पडला, परंतु पेरण्या मात्र २२ जूनपूर्वीच आटोपल्या होत्या.
अमरावती : मागील पाच वर्षांमध्ये २००९ साली पाऊस कमी पडला, परंतु पेरण्या मात्र २२ जूनपूर्वीच आटोपल्या होत्या. इतर वर्षी मान्सून विदर्भात वेळेवर येत आहे. २०११ मध्ये तर विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या पावसाने १०० वर्षांचे रेकॉर्ड मोडले होते. यंदा मात्र जून संपत आला असतानाही पावसाची वक्रदृष्टी कायम असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
मागील पाच वर्षांत विदर्भातील पेरण्या २२ जूनपूर्वीच झाल्यात. यंदा मात्र २७ जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खते, बी-बियाणे घरीच पडून आहेत. शेती मशागतीची कामे आटोपली आहे. ज्यांच्याजवळ सुविधा आहे त्यांनी पावसाची अधिक वाट न पाहता तुषार व ठिबक सिंचनाद्वारे कपाशीची पेरणी केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचे वातावरण नसल्याने पाऊस अद्याप सक्रीय झालेला नाही. २००९ मध्ये पाऊस कमी होता. परंतु पिकाला आवश्यक व पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. मागील वर्षी सरासरीच्या ३२० टक्के अधिक पाऊस पडला. त्यामुळे खरिपासह रबीचीही पिके अती पावसाने खराब झाली. परंतु यंदा पाऊसच नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहता २००९ मध्ये कमी पाऊस, २०१० मध्ये समाधानकारक, २००१ मध्ये सर्वसाधारण पण सरासरी पूर्ण, २०१२ मध्ये कमी पाऊस, २०१३ अती पाऊस, २०१४ मध्ये पावसाची सुरुवातही नाही, असे चित्र आहे. सध्या पेरणीलायक पाऊस नाही. किमान ६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. पेरणी लांबत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढत आहे. (प्रतिनिधी)