पावसाळ्यात २० गावांचा तुटतो संपर्क, ३३ गावे संपर्कक्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:16 PM2019-07-03T23:16:19+5:302019-07-03T23:17:37+5:30

पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे

In the monsoon season, contact of 20 villages, 33 villages outside contact area | पावसाळ्यात २० गावांचा तुटतो संपर्क, ३३ गावे संपर्कक्षेत्राबाहेर

पावसाळ्यात २० गावांचा तुटतो संपर्क, ३३ गावे संपर्कक्षेत्राबाहेर

Next
ठळक मुद्देमेळघाट अलर्ट : हतरूला जाणारी बसफेरी चार महिन्यांसाठी बंद

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १९९३ च्या कुपोषणानंतर कोट्यवधीच्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला. परंतु वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा अजूनही सर्व गावांत पोहोचल्यास नसल्याचे वास्तव आहे. संपर्काअभावी मेळघाटात बालमृत्यूचे भयावह प्रमाण केव्हाही उद्भवू शकते. दळणवळणाची साधने नसल्याने आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा पोहोचू शकत नसून, आजारी रुग्णाला शहराच्या ठिकाणी आणावे कसे, हा प्रश्न अजूनही कायम आहे.
संपर्क तुटणाऱ्या गावात औषध, पोषणसाठा
धारणी व चिखलदरा तालुक्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य विभाग आणि बाल विकास प्रकल्प कार्यालयातर्फे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार साठा आॅक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल एवढा ठेवण्यात आला असल्याचे चिखलदरा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी योगेश वानखेडे यांनी सांगितले. औषध पुरवठा चार महिने पुरेल एवढा ठेवण्यात आला आहे. कुपोषित बालके, आजारी रुग्णांसाठी गावातच व्यवस्था करण्यात आली. मात्र, गंभीर रुग्णांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
बसफेरी १ जुलैपासून बंद
परतवाडा आगारातून अतिदुर्गम हतरुला जाणारी परतवाडा आगाराची बसफेरी १ जुलैपासून चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. सदर रस्ता पूर्णत: नादुरुस्त असून, नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याचे पत्र पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता आय.आय. खान यांनी उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, परतवाडा आगार आदी सर्व विभागांना दिले. या रस्त्यावर असलेल्या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसताना वाहतूक बंद करण्याचे दिलेले पत्र संताप व्यक्त करणारे ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीत वॉकीटॉकीचा वापर
पावसाळ्यात नदी-नाल्यांना पुराण्या सोबत रस्ता नादुरूस्त असल्यामुळे पंधरापेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटतो आरोग्य विभाग व बालविकास विभागाने संपर्क तुटणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा, राक्षा, आढावा बिच्छूखेडा, माडीझडप, मारिता, डोमी कुही खुटीदा, सुमिता, टेंभ्रू बोरदा ,बोदु, पिपल्या, पांढराखडक, नवलगांव, पिपादरी, सलिता, लाखेवाडा, आदी गावे असून धारणी तालुक्यातील परसोली, कुंड,खामदा या बैरागड व बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांचा समावेश आहे,तर चिखलदरा तालुक्यातील ३३ गावांमध्ये संभाषणासाठी कुठल्याच प्रकारे मोबाईलची रेंज नसल्याने बारमाही संपर्क क्षेत्राबाहेरील आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावांसाठी वनविभागाच्या मदतीने वायरलेस यंत्रणा व वाकी टॉकी चा उपयोग जिल्हा प्रशासनाने केला होता.

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य सेवक चार महिन्यांसाठी मुक्कामाला राहतील.
- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा

Web Title: In the monsoon season, contact of 20 villages, 33 villages outside contact area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.