पावसाळा सुरु; नाले सफाई केव्हा?

By Admin | Published: June 21, 2015 12:29 AM2015-06-21T00:29:47+5:302015-06-21T00:29:47+5:30

पावसाळा सुरु झाल्यानंतरही शहरातील लहान, मोठ्या नाले उपसले गेले नाहीत.

Monsoon started; When to clean the drains? | पावसाळा सुरु; नाले सफाई केव्हा?

पावसाळा सुरु; नाले सफाई केव्हा?

googlenewsNext

आयुक्तांचा आदेश गुंडाळला : अंबा नाल्याच्या पुराने प्रशासनाची पोलखोल
अमरावती : पावसाळा सुरु झाल्यानंतरही शहरातील लहान, मोठ्या नाले उपसले गेले नाहीत. आयुक्त गुडेवार यांनी यावर्षी नाले सफाईचे व्यवस्थित नियोजन केले असतानाही संबंधित विभागाने ही प्रक्रिया कागदावरच राबविली आहे. त्यामुळे निम्मे नाले अद्यापही ‘जैसे थे’ असून काठावरील नागरिकांना पुन्हा पूर परिस्थितीचा सामना करावा लागेल.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी मोठ्या, अडचणींच्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी ५० लाखांची तरतूद केली जाते. यापूर्वी पावसाळ्यापूर्वी बांधकाम विभागाकडून नाले सफाईची प्रक्रिया कागदोपत्री राबवून देयके काढली जात होती. परंतु नाल्यांच्या स्वच्छतेमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी यंदा आयुक्त गुडेवार यांनी १४ मोठे तर १७ लहान नाल्यातील गाळ काढण्याची जबाबदारी उपायुक्त, सहायक आयुक्त, अभियंत्यावर सोपविली होती. त्यानुसार १५ मे २०१५ रोजी आदेश काढण्यात आले. गाळ उपसण्याचे व्हिडीओ चित्रिकरण करुन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश होते. परंतु हे नाले व्यवस्थितरित्या उपसण्यात आले नसल्याने पहिल्याचट पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले. बांधकाम, आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. दोन ते तीन महिन्यांपासून गाळ उपसण्याचे ठरविल्यानंतरही महापालिकेतील यंत्रणेने काहीच केलेले दिसत नाही. वडाळी येथून सुरु होणाऱ्या नाल्यातील गाळ उपसून तो काठावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पावसामुळे हा गाळ पुन्हा नाल्यात साचला आहे. हा नाले सफाईचा देखावा कशासाठी? असा सवाल रिपाइंचे शहर उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सफाईच्या नावे लाखोंची देयके काढणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी दाखल करण्याची मागणी रिपाइंने केली आहे.

शहरात हे आहेत लहान, मोठे नाले
बडनेरा येथील स्मशान भूमी जवळील नाला, गांधी विद्यालय, साहिल लॉन, मोहिनी, सिमरन, सार्तुणा, नवाथे, भारतीय महाविद्यालय, अंबानाला, वलगाव रोड, चिलम छावणी, राठीनगर, रहाटगाव, चमननगर, मायानगर, कंवरनगर, ठाकूरवाडी ते जेवडनगर, समाधाननगर, नागपुरीगेट ते पठाणपुरा, फ्रेजरपुरा, भातकुली रोड ते निलकंठ व्यायाम शाळा, शोभानगर, विद्युतनगर, वडरपुरा, गौरक्षणमागील दस्तुरनगर, गोपालनगर, आयटीआय कॉलनी, मरीमाता मंदिर, हमालपुरा अशा एकुण ३१ नाल्यांचा समावेश असून हे सर्व नाले सफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

शहरातील लहान, मोठ्या नाल्यातील गाळ उपसण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित विभागाने नाले सफाईची प्रक्रिया राबविली नसेल तर निश्चित कारवाई होईल. नाले सफाईची पाहणी केली जाईल. काही उणिवा आढळल्यास दोषींवर कारवाई करणारच.
-चंद्रकांत गुडेवार,
आयुक्त, महापालिका

नाले सफाईची बोंब यावर्षीही कायम आहे. अमरावती व बडनेरा शहरातील नाल्यामधील गाळ व्यवस्थितपणे उपसण्यात आला नाही. पहिल्याच पावसाने ते सिद्ध झाले आहे. केवळ कागदोपत्री नाल्यातील गाळ उपसण्याची किमया करुन देयके काढण्यावर कठोर शासन झाले पाहिजे.
-अशोक नंदागवळी,
ेउपाध्यक्ष, रिपाइं.

Web Title: Monsoon started; When to clean the drains?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.