मनपात बदलीचा लपंडाव
By admin | Published: April 30, 2017 12:08 AM2017-04-30T00:08:15+5:302017-04-30T00:08:15+5:30
आयुक्त हेमंत पवार यांनी हाती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसत्रात २७ एप्रिलला पुन्हा १४ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेत.
१४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या : प्रशासकीय वर्तुळात खळबळ
अमरावती : आयुक्त हेमंत पवार यांनी हाती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसत्रात २७ एप्रिलला पुन्हा १४ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेत. यात कनिष्ठ लिपिक, शिपाई व मदतनिसांचा समावेश आहे. यात अपेक्षेप्रमाणे भूषण राठोड यांची बदली जनसंपर्क विभागात करण्यात आली. विशेष म्हणजे वर्षानुवर्र्ष एकाच ठिकाणी ‘सेवा देणाऱ्यांची बदली करण्याचा सपाटाच आयुक्तांनी लावला आहे. मात्र त्याचवेळी काहीजण झालेली बदली रद्द करण्यात यशस्वी होत असल्याने अर्थकारणाची शक्यता बळावली आहे. आयुक्तांना अंधारात ठेवत एक वरिष्ठच ‘हाथ की सफाई’करत असल्याचे महापालिकेत बोलले जाऊ लागले आहे.
बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये पंकज आकोडे, विजय सुंदराणी, शाम चावरे, संजय वडुरकर, एस.यु.काळे, भास्कर कावरे, सुनील चौबे, विजय ढगे, उर्मिला दुबे, अजय चव्हाण, शालिनी पखाले आणि किशोर बाखडे यांचा समावेश आहे. प्रशासनाने पंकज आकोडे यांच्या बदलीबाबत लपंडाव चालविल्याची या यादीवरून स्पष्ट होते. आकोडे हे जीएडी मध्ये कार्यरत असताना त्यांची बदली झोन क्रमांक ५ मध्ये करण्यात होती. मात्र बहुतांशवेळा ते जीएडीचे काम करीत होते. जीएडीच्या अधिकाऱ्यांचा आकोडे यांच्यावर अधिक लोभ होता. त्यामुळे ते येथील फाईल्स हाताळत होते. ‘लोकमत’ने त्याबाबत वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर २१ एप्रिलला ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात आकोडे यांना पुन्हा सामान्य प्रशासन विभागात देण्यात आले. ते रुजूही झाले. मात्र २७ एप्रिलला काढण्यात आलेल्या बदली आदेशात त्यांचे नाव पुन्हा आले. आता त्यांची पदस्थापना एडीटीपीमध्ये करण्यात आली. अशाप्रकारे आकोडे यांचा प्रशासनाने चेंडू केला आहे.२७ एप्रिलच्या बदली आदेशाप्रमाणे आकोडे एडीटीपीत रुजू होतात, की पुन्हा एकदा त्यांची सेवा सामान्य प्रशासन विभागाला लाभते, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
बदलीमध्ये अर्थकारण
महापालिकेतील बदलीसत्राने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना दोन बदल्यांमध्ये अर्थकारण साधला गेल्याचा आक्षेप आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यात मलिदा लाटला असल्याची कुजबूज महापालिकेत रंगली आहे. चार बदल्यांना राजकीय दबावतंत्राने ब्रेक लावल्याचा आरोप आहे.
बदल्या बदलतात कशा ?
सामान्य प्रशासन विभागाकडून संचिका चालल्यानंतर उपायुक्त (प्रशासन) हे बदली आदेशामधील यादी अंतिम करतात. त्यावर आयुक्त स्वाक्षरीने शिक्कामोर्तब करतात. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने बदल्या केल्या जातात. मात्र अवघ्या तासाभरात किंवा दोन दिवसात बदल्यांमध्ये बदल केल्या जातो.