खरीप विम्यात सव्वा लाख शेतकऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:28 AM2019-08-01T01:28:10+5:302019-08-01T01:29:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाची सरासरी कमी आहे त्यातच २ जुलैपासून तब्बल १८ दिवस पावसाने ओढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाची सरासरी कमी आहे त्यातच २ जुलैपासून तब्बल १८ दिवस पावसाने ओढ दिली. दुष्काळाच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. यामुळे किमान पिकांना आपत्तीच्या काळात संरक्षण मिळून आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यातील १ लाख २२ हजार २२४ शेतकऱ्यांनी ३१ जुलै या अखेरच्या दिवसापर्यंत किमान दीड लाख हेक्टरवरील पिकाचा विमा उतरविला आहे. भरपाईसाठी विमा कंपन्यांच्या अनुभव फारसा चांगला नसल्याने निम्म्या शेतकºयांनी याकडे पाठ फिरविली असल्याचे वास्तव आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास पीक संरक्षण, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकºयांना नावीन्यपूर्व व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे तसेच कृषिक्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे हे या योजनेचे उद्देश असले तरी मागील वर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव विपरीतच आहे. मागील वर्षी म्हणजेच २०१८-१९ या हंगामात १ लाख ५४ हजार ४९३ शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार ३९० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला. प्रत्यक्षात यासाठी ४७ कोटी ७ लाख ३ हजारांचा हप्तादेखील भरणा केला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे पाच तालुक्यांत दुष्काळ व १३ तालुक्यांची पैसेवारी ही ४६ राहिली. तरीही विमा कंपन्यांद्वारे फक्त ८,४४४ शेतकऱ्यांना ६ कोटी ६४ लाख ५८ हजारांची भरपाई मिळाली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी यावेळी २४ जुलै ही अंतिम तारीख होती. मात्र, सर्व्हर डाऊनसह आॅनलाइन सातबारा मिळण्यात येणाºया तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत. यामुळे पाच दिवसांची म्हणजेच २९ जुलै व नंतर ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळघार पाऊस होत असल्याने मुदतवाढीचा फारसा फायदा शेतकºयांना झालेला नाही.
पीक विमा योजनेसाठी नुकसानभरपाई ही विमा क्षेत्र घटकातील कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवर आधारित आहे. एखाद्या निर्धारित क्षेत्रात संबंधित पिकाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले, तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येईल, अशी जाहिरात कृषी विभागासह विमा कंपन्या करीत आहेत. प्रत्यक्षात शेतकºयांचा अनुभव मात्र त्याच्या विपरीत आहे. तालुका घटक गृहीत न धरता संबंधित गावक्षेत्रातील सरासरी उत्पन्नावर शेतकºयांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
विमा संरक्षण कोणाला?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल.