बायोकॅप्सूल तंत्रज्ञानाद्वारे अधिक उत्पादनाची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:33 AM2018-09-07T01:33:16+5:302018-09-07T01:33:51+5:30
उत्पादन खर्च कमी करून शेतमालातून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी बायोकॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना जैविक खते व सेंद्रिय खत देण्याचे आवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उत्पादन खर्च कमी करून शेतमालातून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी बायोकॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना जैविक खते व सेंद्रिय खत देण्याचे आवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी केले.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे मोर्शी येथे एम.ए.आय.डी.सी. व एस.आर.टी. अॅग्रो सायन्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या शेतकरी, वितरक कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बोंडे समन्वयक शशीकांत पठारे, शिरीष टांक, डी.एस. पाटील, किशोर राठोड, तालुका कृषि अधिकारी संगेकर व विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, तसेच वितरक, उपवितरक आदी उपस्थित होते.
सेंद्रिय खते व बायोकॅप्सूल तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा व नवीन तंत्रज्ञान असलेल्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन बोरसे यांनी केले.
जिल्ह्याचा भौगोलिक, पीकनिहाय लेखाजोखा विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे यांनी सादर करून सरळ व संयुक्त रासायनिक खताबाबतच्या उत्पादन व वापराबद्दल पॉवर पॉर्इंट प्रजेंटेशनद्वारे माहिती दिली. देशाच्या तिजोरीवर रासायनिक खताच्या अनुदनामुळे जो करोडो रुपयांचा अवाजवी भार पडत आह,े त्याला पर्यायी म्हणून जैविक खते वापरण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, येणाऱ्या हंगामात या नावीण्यपूर्ण जैविक खताची उपलब्धता कृषी उद्योग महामंडळाच्या अधिकृत विक्रेत्याार्फत करण्यात येणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. सागर विरखरे यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक सत्यजित ठोसरे, मिलिंद तायडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सुमारे २५० शेतकरी बांधव उपस्थित होते.
बायोकॅप्सूलमध्ये एक लाख करोड जैविक जिवाणू
जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानातून उत्पादित एका बायोकॅप्सूलमध्ये १ लाख करोड जैविक जिवाणू उपलब्ध असल्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, तूर, कपाशी तसेच सर्व भाजीपाला व फळवर्गीय पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी फायदा होतो, असे महामंडळाचे समन्वयक पठारे म्हणाले. रायपूर येथील शिरीष टांक यांनी शेतकºयांना कीड व रोगाबाबत विनालागतची घरगुती उपाययोजनेची माहिती दिली.