आदिवासींच्या उत्थानासाठी मोर्शीत कार्यालय !
By admin | Published: May 11, 2016 12:39 AM2016-05-11T00:39:32+5:302016-05-11T00:39:32+5:30
वरुड-मोर्शी तालुक्यातील आदिवासी बांधवांना व विद्यार्थ्यांना आदिवासी विकासाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती व लाभ घेता यावा, ....
राजे अंबरिश आत्राम : २०१९ पर्यंत सर्व आदिवासी कुटुंबांना घरकुलाचा लाभ
अमरावती : वरुड-मोर्शी तालुक्यातील आदिवासी बांधवांना व विद्यार्थ्यांना आदिवासी विकासाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती व लाभ घेता यावा, यासाठी मोर्शी येथे सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय निर्माण करणार असल्याची घोषणा आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरिशराव आत्राम यांनी शनिवारी केली.
मोर्शी तालुक्यातील एकूण ११ कोटी ३१ लक्ष ९९ हजार रुपयांच्या विविध आदिवासी विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आत्राम यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. विकासकामांमध्ये आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे भूमिपूजन, अंबाडा-सायवाडा येथील आदिवासी शासकीय भवनाचे भूमिपूजन व धानोरा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीचे लोकार्पण आदी कामांचा समावेश आहे. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, वर्धा मतदारसंघाचे खा. रामदास तडस, मोर्शी-वरुड मतदारसंघाचे आ. अनिल बोंडे, धारणीचे प्रकल्प अधिकारी षणमृगराजन एस., सहायक प्रकल्प अधिकारी पेढेकर, वसुधा बोंडे, जि.प. सदस्या अर्चना मुरुमकर, सविता धुर्वे, अंबाडा येथील सरपंच सुलोचना कंगाले तसेच आर्ट आॅफ लिव्हिंगचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री प्रवीण पोटे आपल्या भाषणात म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पात पाच टक्के निधी हा आदिवासी समाजाच्या विकासासाठी खर्च केला जातो. गेल्यावर्षी आदिवासी विकास विभागाने सुमारे १८० कोटींचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग केला आहे. या निधीचा उपयोग आदिवासी बांधवांनी आपल्या गावांचा विकास व मूलभूत सोयी-सुविधा पूर्ण करण्यासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले. खा.रामदास तडस यांनी आदिवासी विकास राबवीत असलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना करून दिली.
मोर्शी-वरुड परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण निवासासह घेता यावे, यासाठी या दोन्ही तालुक्यांत मुलांसाठी दोन व मुलींसाठी दोन असे चार २५०-३०० विद्यार्थिक्षमता असलेले वसतिगृह उभारण्याची मागणी बोंडे यांनी केली. आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी आदिवासी विकास विभागाने विशेष सहकार्य करावे.
तीनही भूमिपूजन व लोकार्पण तसेच सामूहिक आदिवासी विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला मोर्शी, अंबाडा-सायवाडा, धानोरा व भिवकुंडी गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)