मोर्शी, धारणी तालुक्यात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:29 AM2019-09-05T01:29:34+5:302019-09-05T01:30:11+5:30
मोर्शीत दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाली. दमयंती नदीला पूर आल्यामुळे पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मेन मार्केट, आठवडी बाजार, आंबेडकर चौक, खोलवटपुरा या भागांत आठ ते नऊ फूट पाणी होते. गजानन कॉलनी येथील राजेश मुंगसे व आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे साहित्य इतरत्र हलविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : गेल्या आठवडाभर विश्रांतीला गेलेल्या पावसाने मोर्शी तालुक्यात बुधवारी अतिवृष्टीच्या स्वरूपात हजेरी लावली. तीन तासांच्या पावसाने मोर्शी शहरात आठ ते नऊ फूट पाणी भरले होते. यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले.
मोर्शीत दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाली. दमयंती नदीला पूर आल्यामुळे पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मेन मार्केट, आठवडी बाजार, आंबेडकर चौक, खोलवटपुरा या भागांत आठ ते नऊ फूट पाणी होते. गजानन कॉलनी येथील राजेश मुंगसे व आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे साहित्य इतरत्र हलविण्यात आले. काली परिसरातील दिलीप वानखेडे, मिलिंद ढाकुलकर ते सरकारी दवाखान्याच्या बाजूला आंबेडकर चौकापासून माळगे बिछायत केंद्रापर्यंत असलेल्या रस्त्याच्या बाजूची सर्व घरांमध्ये पाणी जमा झाले. पावसाचा जोर दुपारी ४ पर्यंत कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्री मार्केटसमोरील रस्त्यावर तीन फूट पाणी असल्यामुळे गुजरी बाजारकडे जाणारी वाहतूक बंद होती. यादरम्यान ८५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
१५ सदस्यांचे बचाव पथक मोर्शीला रवाना
मोर्शी येथील पूरस्थितीत नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांच्या यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले असून, १५ सदस्यांचे बचाव पथक मोर्शीला रवाना करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे काही कुटुंबांना नगर परिषदेच्या शाळांत हलविण्यात आले.
अप्पर वर्धा ८१ टक्के
अप्पर वर्धा धरणाची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी ५ वाजता जलाशयाच्या पाण्याची पातळी ८१.३९ टक्के झाली आहे. जलाशयात ३४१.२८ मीटर उपयुक्त व ४५९.१० मीटर एकूण पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या निर्धारित क्षमतेला केवळ १.२२ मीटर कमी असल्याने धरणाची सर्व १३ दारे केव्हाही उघडू शकतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.