मोर्शीनजीक वाघाचा बाप-लेकीवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:03 AM2018-11-02T01:03:47+5:302018-11-02T01:04:11+5:30
नरभक्षक वाघाची दहशत जिल्ह्यावर असतानाच पुन्हा दोघांवर वाघाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी जामगाव खडका ते पांढरघाटी मार्गावरील उमरी ते गहू बारसा दरम्यान दुपारी ३.३४ वाजता घडली. नरभक्षक वाघाचे लोकेशन पलासपानी येथे असताना, हा वाघ कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : नरभक्षक वाघाची दहशत जिल्ह्यावर असतानाच पुन्हा दोघांवर वाघाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी जामगाव खडका ते पांढरघाटी मार्गावरील उमरी ते गहू बारसा दरम्यान दुपारी ३.३४ वाजता घडली. नरभक्षक वाघाचे लोकेशन पलासपानी येथे असताना, हा वाघ कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मोर्शी येथून अवघ्या १२ किमी अंतरावरील जामगाव खडका येथून शेतमजूर शंकर नरे हे त्यांच्या मुलीला घेऊन दुपारी ३ वाजताच्या सुमारास दुचाकीने मध्य प्रदेश सीमेवरील गहू बारसाकडे जात होते. मध्य प्रदेशातील सातपुडा परिक्षेत्रांतर्गत बैतूल जिल्ह्यातील उमरी ते गहू बारसा मार्गात अचानक वाघाने त्यांच्या दुचाकीवर हल्ला चढविला. त्या वाघाने शंकर नरे यांच्या मानेवर पंजा मारण्याचा पवित्रा घेतला होता. शंकर नरे यांनी तो चुकविला; मात्र वाघाच्या नखांनी शंकर नरे यांचे ओठ फाटले. दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळला. दुचाकीवर त्यांच्यामागे बसलेली मुलगी मोनिका खाली कोसळली. वाघाचा पुन्हा हल्ला होणार तेवढ्यात मागून येत असलेल्या भांडेविक्रेत्याने मोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे गोंधळून वाघ घटनास्थळाहून पळाला. जखमी शंकर नरे व मोनिकाला शेतमालक सतीश गेडाम यांनी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान शंकर नरे यांनी 'लोकमत'शी बोलताना ही माहिती दिली.
दरम्यान, धामणगाव रेल्वे व तिवसा तालुक्यात दोघांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाचे ताजे पगमार्क पलासपाणी शिवारातच दुपारी ३.२७ दरम्यान आढळून आले. त्यामुळे तो गहू बारसा भागात गेला नसावा. आम्ही लोकेशन घेत आहे, अशी माहिती मोर्शी वनपरिक्षेत्राधिकारी आनंद सुरत्ने यांनी दिली.
जखमींना अमरावतीला हलविले
शंकर नरे व मोनिका यांच्यावर मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विवेक साबळे यांनी प्रथमोपचार केला. मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय कळस्कर यांच्या सल्ल्यानुसार त्यांना अमरावतीला हलविले.
सतीश गेडाम यांच्या शेतात सोकारी
शंकर नरे हे मध्य प्रदेशातील गहू बारसा येथील रहिवासी असून, ते मोर्शी येथील सतीश गेडाम यांच्या दापोरी शिवारातील शेतात सोकारीला आहेत.
मध्य प्रदेशातील बैतूल येथे गुरुवारी वाघाचे लोकेशन मिळाले. त्याच्या मागावर वनविभागाचे कर्मचारी आहेत. मॉनिटरिंग व ट्रॅकिंग सुरूच आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षकांना उपाययोजना करण्यास कळविले आहे.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर