‘सेव्हींग’चे धनादेश वापरून ‘करंट’चा गोरखधंदा
By admin | Published: March 5, 2016 12:22 AM2016-03-05T00:22:54+5:302016-03-05T00:22:54+5:30
धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावे बनावट धनादेश वटवून फसवणूक केल्याच्या प्रकरणाचे गूढ हळूहळू उकलत आहे.
२२.६० लाखांचे फसवणूक प्रकरण : दुसऱ्या आरोपीने उकलले गूढ
अमरावती : धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावे बनावट धनादेश वटवून फसवणूक केल्याच्या प्रकरणाचे गूढ हळूहळू उकलत आहे. याप्रकरणातील दुसऱ्या मास्टरमार्इंडला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री नागपूर जिल्ह्यातून अटक केली. चौकशी दरम्यान बनावट धनादेशाच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. सेव्हिंग खात्याचे धनादेश वापरुन करंट खात्यावर हजारो रुपयांचा धंदा झाला.
सायबर सेल प्रमुख एपीआय कांचन पांडे आणि उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या पथकाने कळमेश्वर तालुक्यातील खुमारी मोहपा या गावातून विक्रम शशिकांत घोगरे (३५) या आरोपीला गुरुवारी उशिरा रात्री अटक केली. यापूर्वी अटक केलेल्या सुदीप सोनीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना घोगरेपर्यंत पोहोचता आले.
आरोपी सुदीप श्रीराम सोनी याच्या बचत खात्याचे धनादेश बनावट धनादेशासाठी वापरण्यात आले. धनादेशावर मुद्रित मूळ मजकूर बेमालुमपणे खोडून त्यावर बनावट नाव, रक्कम लिहिली गेली आणि त्यानंतर ते धनादेश खरे म्हणून वटविण्यात आले. उपरोक्त दोन आरोपींच्या अन्य एक साथीदाराने गाडगेनगर भागात भाड्याची खोली करताना मोबाईल क्रमांक दिला होता. एटीएममधून रक्कम विड्रॉल केल्यानंतर याच क्रमांकावरुन सुदीप सोनीशी संपर्क साधण्यात आला. एटीएम ट्रान्झॅक्शन, बँक खाती, कॉल डिटेल्सचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर अमरावतीमधील एका बँकेत खाते उघडताना दिलेला मोबाईल क्रमांक आणि घरमालकाला दिलेला मोबाईल क्रमांक ‘ट्रेस’ झाल्याने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. याप्रकरणी धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावरही पोलिसांनी नजर रोवली आहे.
बनावट धनादेश प्रकरणाचे तार नागपूरशी
बनावट धनादेश वटवून बँक तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाला झटका देणारा दुसरा आरोपी विक्रम शशीकांत घोगरे याला नागपूरहून जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळविले. विशेष म्हणजे या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने १ मार्चला सुदीप श्रीराम सोनी (४८, महाल, नागपूर) याला अमरावतीमधील एका हॉटेलमधून अटक केली होती.
सहावा धनादेश वटवताना प्रकार उघड
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत कन्यादान योजनेचे ६ धनादेश बनावटरीत्या वटविण्यात आले. त्यापैकी पाच दर्यापूर, अकोला, धारणी, वर्धेला विड्रॉल करण्यात आले. सहावा धनादेश वटला नाही. त्यावेळी हा गोरखधंदा उघड झाला. ४.४०, ४.६०, ४.२५, ४.७० आणि ४.६५ लाखांचे ते धनादेश होते. वटविलेल्या बनावट धनादेशांची रक्कम कळमेश्वर, नागपूर, कामठी आणि नवाथे चौकातील एटीएममधून काढण्यात आली. याच एटीएमच्या धागा पकडून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.
असा आहे घटनाक्रम
२९ आॅक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हा गुन्हा घडला. धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे सुमारे २२.६० लाखांचे बनावट धनादेश वटविण्यात आलेत. ९ जानेवारी २०१६ ला यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या आरोपीला १ मार्चला अटक करण्यात आली.
विक्रम घोगरेला कमिशन
मुख्य सूत्रधार सुदीप सोनी याने विक्रम घोगरे याला एटीएममधून रक्कम काढण्याच्या मोबदल्यात कमिशन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. विक्रमनेच खऱ्या धनादेशावर खोडतोड करुन बनावट धनादेश ‘प्रिंट’ केले. यात महागड्या प्रिंटर्ससह अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला. हे साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी दुपारीच धारणीकडे रवाना झाले.